नभं उतरू आलं…! मॉन्सूनचे तळकोकणात दमदार आगमन; लवकरच राज्य व्यापणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उकाड्याने त्रस्त झालेल्या राज्यातील नागरिकांना वरुणराजाने दिलासा दिला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शनिवारी मॉन्सूनने तळकोकणात दणक्यात प्रवेश केला आहे. आता लवकरच तो राज्य व्यापणार आहे. येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातील इतर भागात मॉन्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सूनने अखेर तळकोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. आता मुंबईसह राज्याच्या इतर भागांकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील मॉन्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे.

भारतीय हवामान विभागाने शनिवारी मान्सूनने तळकोकणात प्रवेश केल्याची अधिकृत घोषणा केली. गोवा पूर्णपणे व्यापल्यानंतर मोसमी वाऱ्यांनी दक्षिण कोकणात हजेरी लावली असून आता मुंबईसह राज्याच्या उर्वरित भागाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे.

दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे यांसह वादळ होण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

यंदा मान्सूनचे केरळमध्ये आगमन नेहमीपेक्षा तीन दिवस उशिराने झाले. ४ जून रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल झालेल्या मान्सूनने त्यानंतर वेग पकडला. अवघ्या दोन दिवसांत त्याने कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि अरबी समुद्रातील आणखी काही भाग व्यापत महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत मजल मारली. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण अनुकूल आहे.

मान्सून तळकोकणात दाखल झाल्यानंतर पुढील टप्पा मुंबई आणि उत्तर कोकणाचा असतो. अनेकदा दक्षिण कोकणात आगमन झाल्यानंतर मान्सून वेगाने पुढे सरकतो. त्यामुळे मुंबईतही लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. काही भागांत पावसाचा जोर वाढण्यासह वाऱ्याचा वेगही वाढू शकतो.

गेल्या वर्षी मान्सूनने २४ मे रोजी केरळमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो तळकोकणात पोहोचला आणि २६ मे रोजी मुंबईत दाखल झाला होता. यंदा केरळमध्ये आगमन उशिरा झाले असले तरी पुढील प्रवास तुलनेने वेगाने होताना दिसत आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेली जनता आणि बळीराजा यांना दिलासा मिळाला आहे.