Beed News – पोलीस अंमलदाराचचं “कॅरेक्टर खराब” झालं! 10 हजारांची लाच घेताना ACB ने रंगेहाथ पकडलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सरकारी विभाग आणि पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा सर्वसामान्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. अशा लाचखोरांवर कारवाई सुद्धा होते. मात्र, ही भ्रष्टाचाराची साखळी खंडित होताना दिसत नाहीये. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सातत्याने कारवायांचा धडाका लावला आहे. याच धडाक्यात आता बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्यात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील वादग्रस्त पोलीस अंमलदार दत्तात्रय बळवंत याला तब्बल 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, ही कारवाई थेट नेकनूर पोलीस ठाण्याच्या आवारातच करण्यात आल्याने जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून खाकी वर्दी पुन्हा एकदा डागाळली आहे.

एका प्रकरणातील कायदेशीर कामासाठी पोलीस अंमलदार बळवंत याने तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेतली. या तक्रारीची गुप्तपणे पडताळणी केल्यानंतर, जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने पोलीस ठाण्याच्या परिसरातच सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने झडप घालून बळवंत याला जाळ्यात पकडले. सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून एसीबी पुढील तपास करत आहे.

अटक करण्यात आलेला अंमलदार दत्तात्रय बळवंत हा आधीपासूनच आपल्या अरेरावी आणि वादग्रस्त वर्तनामुळे चर्चेत होता. काही महिन्यांपूर्वी शेतीच्या वादावरून UPSC चा अभ्यास करणाऱ्या एका तरुणाला, “तुझे कॅरेक्टर खराब करून टाकेन,” अशी धमकी दिल्याचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावेळी त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र, बळवंत मानेने या प्रकरणातून कोणताही धडा न घेता, थेट पोलीस ठाण्याच्या आवारातच लाच घेण्याचं धाडस दाखवलं आणि लाच घेताना हे महाशय थेट ACB च्या जाळ्यात अडकले.