
कुर्ला पश्चिमला पुलाचे काम सुरू असून त्यासाठी खोदकाम सुरू असताना 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. यामुळे अनेक भागांमध्ये पाणीबाणीची व्यवस्था निर्माण झाली होती. याबाबत माहिती मिळताच पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. जलवाहिनीच्या बाजूला महानगर गॅस कंपनीची लाईन असून सुदैवाने ती सुस्थितीत आहे.
कुर्ला पश्चिमला पुलासाठी खड्डा खोदण्याचे काम सुरू आहे. या खोदकामादरम्यान पाच मीटर खोल असलेल्या जलवाहिनीला तडा गेला. त्यामुळे जलवाहिनीचा 1.5 मीटर लांबीचा भाग खराब झाला आहे. पाणीपुरवठा विभागाकडून या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र जलवाहिनीच्या एका बाजूला 300 मिमी व्यासाची महानगर गॅसची पाईप लाईन असून दुसऱ्या बाजूला पुलाच्या पायाभूत संरचनेचे खांब आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पथकाला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे काम संथगतीने सुरू असून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. लवकरच हे काम पूर्ण करून सोमवारी पहाटेपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी शक्यता पालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता दिलीप पाटील यांनी वर्तवली आहे. सोमवारी सकाळी प्रभावित भागांत टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात असल्याची माहितीही त्यांनी दिली.



























































