
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी टँकरचालकांच्या संपावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे नियम मुंबईसाठी तर्कहीन आहेत, तरीसुद्धा ते नियम लावून सरकार टँकरचालकांना दंड आकारत असल्याने त्यांनी संप पुकारला आहे. वर्षभरापूर्वी ते नियम बदलण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, त्याचे काय झाले? भाजपला मुंबईचा इतका द्वेष का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. “मुंबई महानगरपालिकेने लागू केलेल्या पाणीकपातीमुळे मुंबई आधीच पाणीटंचाईचा सामना करत आहे. पाणी कपात 10 टक्के असल्याचे सांगितले जात असले तरी, काही भागांमध्ये ती प्रत्यक्षात त्याहून खूप जास्त आहे. सरकार पुरेसा पाणीपुरवठा करू शकत नाही म्हणून लोकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे आणि आता सरकार टँकरवरच दंड आकारत आहे.’’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
गेल्या संपानंतर जवळपास वर्षभराने मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने पुन्हा एकदा मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे. गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिका आणि भाजपने हस्तक्षेप करण्याचे नाटक केले, नियमांमध्ये बदल करण्याचे आश्वासन दिले, पण काहीच झाले नाही. भाजपचे सर्व स्तरांवर सरकार आहे आणि ते आपली आश्वासने पाळण्यास नकार देत असून मुंबईला त्रास होईल याची खात्री करत आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकारने 2022 मध्ये आणलेला क्षारविरहितीकरण प्रकल्प रद्द केला नसता, तर तो 2025 पर्यंत कार्यान्वित झाला असता आणि कोणतीही तूट निर्माण झाली नसती, याचीही आठवण आदित्य ठाकरे यांनी करून दिली. आजही जलशक्ती मंत्रालय त्यांच्या नियमांमध्ये बदल करू शकते, पण दुर्दैवाने विद्यमान सरकारमधील कुणीही त्यात हस्तक्षेप करायला तयार नाही म्हणून मुंबईला त्रास सहन करावा लागत आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.





























































