
ईपीएफओकडून आर्थिक वर्ष 2025-26 साठी खातेदारांना 8.25 टक्के व्याजदर जाहीर करण्यात आला आहे. ईपीएफओने या निर्णयाची घोषणा आणि नोटिफिकेशन मार्च महिन्यात जाहीर केले होते, मात्र त्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी व्याजाची रक्कम पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा झालेली नाही. कोट्यवधी खातेदार व्याज कधी मिळणार याची वाट पाहत आहेत.
आतापर्यंत ईपीएफओकडून व्याजाची रक्कम खातेदारांच्या खात्यात जमा कधी होणार हे सांगण्यात आलेलं नाही. ईपीएफओकडून खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम वर्ग करण्यात आल्यानंतर पीएफ बॅलन्समध्ये आणि पासबुकवर दिसेल. सध्या तरी कोट्यवधी खातेदार वेटिंगवर आहेत. आर्थिक जाणकारांच्या मते पीएफ खातेदारांनी व्याजाची रक्कम जमा होण्यास उशीर झाला तरी चिंता करण्याची गरज नाही. ईपीएफओकडून नियमानुसार व्याजाच्या रकमेची मोजणी झाल्यानंतर खात्यात जमा होते.
व्याजाची रक्कम कधी येते?
ईपीएफओकडून व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया निश्चित केलेली आहे. ईपीएफओकडून व्याजदर जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारकडून म्हणजेच वित्त मंत्रालयाकडून त्याला मंजुरी दिली जाते. यानंतर ईपीएफओ खात्यांना सुसंगत केले जाते आणि व्याजाची रक्कम खातेदारांच्या खात्यात जमा करण्यापूर्वी कोटय़वधी खात्यांचं रेकॉर्ड अपडेट केलं जातं.
शिल्लक कशी तपासायची?
पीएफ खातेदारांकडे खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. ईपीएफओ पासबुक वेबसाईटवर यूएएन क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून शिल्लक तपासता येते. याशिवाय उमंग अॅपद्वारेदेखील पीएफ खात्यातील शिल्लक तपासता येते. 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल करून शिल्लक रक्कम तपासात येईल.



























































