
घणसोली येथील सेक्टर 21 मधील कुबेर अपार्टमेंट या इमारतीत शनिवारी रात्री आगीचे उशाळले. या आगीत चारजण जखमी झाले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या दहा रहिवाशांची सुटका केली आहे. जखमींना कोपरखैरणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
घणसोली येथील कुबेर अपार्टमेंट या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका घरात शनिवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात ही आग दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत जाऊन पसरली. आगीमुळे इमारतीमध्ये प्रांजल जाधव, कौशल्य पिंगळे, राहुल जगताप आणि अंकिता जगताप हे चौघे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना कोपरखैरणे येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आगीमुळे 10 जण विविध मजल्यांवर अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्वच रहिवाशांची सुखरूप सुटका केली.
- घणसोली गावात इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
- ही इमारत निवासी भागात असल्याने ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, रबाळे एमआयडीसी केंद्रांच्या गाड्याही घणसोलीत आल्या.
- अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे दोन तासांत ही भीषण आग आटोक्यात आणली. आग विझवल्यानंतर कुलिंगचे काम आज पहाटेपर्यंत सुरू होते. आगीचे कारण अद्याप उघड झालेले नाही.




























































