चिपी विमानतळाबाहेर मुदत संपलेली औषधे, सतर्क ग्रामस्थांमुळे प्रकार उघडकीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुदत संपलेली औषधे वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळाच्या हद्दीबाहेर सापडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. ही बाब सतर्क ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस पाटील यांच्यामार्फत मालवणमधील नामवंत मेडिकल स्टोअर्सशी संपर्क साधत त्यांच्यामार्फत ही औषधे उचलून विल्हेवाट लाकण्यात आली.

चिपी विमानतळाच्या हद्दीबाहेर असलेल्या गाडेधाववाडी जय भवानी बस स्टॉप नजीक रस्त्यालगत मुदत संपलेली औषधे उघड्यावर फेकून दिली असल्याचे ग्रामपंचायत सदस्य अजय सारंग आणि ग्रामस्थ सागर बावकर यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी पोलीस पाटील संदेश पवार यांच्याशी संपर्क साधून संबंधित घटनेची माहिती दिली.

माळरानावर विविध ठिकाणी फेकलेली ही औषधे उघड्यावर टाकणे गंभीर गुन्हा असून अशी औषधे घातक असून पर्यावरणात विषारी रसायने पसरवतात. ती पिण्याच्या पाण्यात विरघळून आजार पसरवू शकतात शिवाय चरणाऱ्या जनाकरांनाही त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या गोष्टींची दखल घेऊन पोलीस पाटील पवार यांनी मालवणमधील त्या मेडिकलशी संपर्क साधून अशी औषधे तात्काळ उचलण्यास सांगितले.