
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने सप्तशृंग गडावरील अतिक्रमणे काढण्याचा धडाका लावला आहे. सार्वजनिक जागा, अंतर्गत रस्ते तसेच वर्दळीच्या मार्गांवरील अतिक्रमणांवर थेट कारवाई करण्यात येत असल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. कुंभमेळा आढावा बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कश्मीरा संखे यांनी अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली. सार्वजनिक जागांवर उभारण्यात आलेले तात्पुरते अडथळे, रस्त्यांमधील अडसर, दुकानांसमोरील स्टॉल्स, हॉटेल व्यावसायिकांनी बाहेर मांडलेल्या खुर्च्या व अन्य साहित्य हटवण्यात आले.



























































