
दादरमध्ये भरधाव बेस्ट बसने अनेक गाड्यांना धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या अपघातात चार पादचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. दादरमधील कोतवाल गार्डनजवळ ही घटना घडली. दरम्यान, अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, मात्र बेस्ट प्रशासनाने याला अधिकृत दुजोरा दिला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दादरच्या कोतवाल गार्डन येथे प्लाझा सिनेमाजवळ बेस्टच्या ताफ्यातील ओलेक्ट्रा कंपनीच्या बसने अनेक वाहनांना धडक दिली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने टॅक्सी, ओला-उबर कारसह दुचाकींना धडक दिली. या घटनेत चार पादचारीही जखमी झाले.
प्लाझा सिनेमा परिसरात आधीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्यात अपघातामुळे यात आणखीनच भर पडली. अपघातामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू असून मुंबई वाहतूक पोलीस परिस्थितीचे व्यवस्थापन करत आहेत.
बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसचा धोक्याचा प्रवास
बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसचा प्रवास धोक्याचा ठरत आहे. तीन वर्षांत 958 अपघातांपैकी 85 टक्क्यांहून अधिक अपघात वेट-लीज बसशी संबंधित आहेत. जानेवारी 2023 ते डिसेंबर 2025 या तीन वर्षांच्या कालावधीत बेस्टचे बसचे 958 अपघात झाले. त्यामध्ये 77 जणांचा मृत्यू आणि 217 जण जखमी झाले. केवळ 2025 मध्ये 606 मोठे आणि किरकोळ अपघात नोंदवले गेले असून त्यापैकी 582 अपघात वेट-लीज बसेसचे होते. 2024-25 आर्थिक वर्षात झालेल्या 12 प्राणघातक अपघातांपैकी 10 अपघात वेट-लीज इलेक्ट्रिक बसेसचे होते. 2025-26 मध्ये बेस्ट बस अपघातांमधील 24 मृत्यूंपैकी 88 टक्के मृत्यू वेट-लीज बसशी संबंधित आहेत.





























































