मराठी भाषा टिकवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवा ! बोईसरमधील संवाद मेळाव्यात कळकळीचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी शाळांचा प्रश्न हा केवळ शिक्षणापुरता मर्यादित नसून तो मराठी समाजाच्या अस्तित्वाशी निगडित आहे. एखाद्या समाजाची भाषा संपली की, सांस्कृतिक ओळख आणि अस्तित्वही धोक्यात येते. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता टिकवायची असेल तर जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवा, असे कळकळीचे आवाहन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी आज केले.

मराठी अभ्यास केंद्र आणि मराठी वाचवू या समितीच्या संयुक्त विद्यमाने बोईसरमध्ये ‘महाराष्ट्र धर्म आणि मराठीकरण’ या विषयावर कार्यकर्ता संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना दीपक पवार यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मराठी भाषेची व शाळांची सद्यस्थिती सांगितली. ते म्हणाले की, राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची घटणारी संख्या ही चिंतेची बाब आहे.

या संवाद मेळाव्यास जितेंद्र राऊळ, डॅरेल डिमेलो, रमाकांत पाटील, पी. टी. पाटील, समीर मोरे, सुशील शेजुळे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी, मराठीप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशील शेजुळे यांनी केले तर सूत्रसंचालन छबीलदास गायकवाड यांनी केले.

सतत एमएमआर असा उल्लेख का करता?

राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा स्वतंत्र उल्लेख करण्याऐवजी प्रशासनाकडून ‘मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर)’ या संज्ञेचा वाढता वापर होत असल्याबद्दल डॉ. दीपक पवार यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, या पाच जिल्ह्यांची स्वतंत्र ओळख हळूहळू पुसली जात आहे. भविष्यात या भागाची वेगळी प्रशासकीय ओळख निर्माण करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे स्थानिक भाषा, संस्कृती आणि सामाजिक अस्मितेच्या प्रश्नांवर अधिक सजग राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.