‘कोकण कट्टा’ हा निराधारांचा आधार; विरारच्या साई आधार संस्थेला धान्य, शैक्षणिक साहित्य वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विलेपार्ले येथील ‘कोकण कट्टा’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने विरार येथील भाताणे गावातील साई आधार या निराधारांचा आधार असलेल्या संस्थेला दोन हजार किलो तांदूळ, दोनशे किलो डाळ त्याचप्रमाणे मुलांना खाऊ, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कोकण कट्ट्याच्या माणुसकीच्या मदतीमुळे गरजूंना मोलाची मदत मिळाली.

विलेपार्ले येथील श्री स्वामी समर्थ मठ यांचे या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले. साई आधारच्या निवासस्थानी जाऊन कोकण कट्ट्याचे संस्थापक अजित पितळे, दादा गावडे, सुजित कदम, प्रभाकर फणसेकर, जयेश बंदरकर, सचिन दिवाळे, राजू चव्हाण, आत्माराम डिके, प्रथमेश पवार यांच्यासह सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. संस्थेच्या वतीने ग्राम संवर्धन पेण व मोखाड्याची सह्याद्री संस्था यांना धान्य दिले जाणार आहे.

मुलांच्या चेहऱ्यावर आनंद

कोकण कट्ट्याचे संस्थापक अजित पितळे व अध्यक्ष विवेक वैद्य यांनी तसेच साई आधारचे विशाल परुळेकर यांनी या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानले. धान्य, शैक्षणिक साहित्य वाटप केल्यानंतर साई आधार येथील मुलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत होता.