दक्षिण फिलीपिन्समध्ये 7.8 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, 5 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
earthquake-measuring

दक्षिण फिलीपिन्समधील मिंडानाओ किनारपट्टीजवळ सोमवारी 7.8 तीव्रतेचा अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला. या भीषण भूकंपामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली अवघ्या 10 किलोमीटर खोलीवर होता. भूकंप आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संस्थांनी या भूकंपानंतर फिलीपिन्स, इंडोनेशिया आणि जपानसह किनारपट्टीच्या भागात त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे 7.37 वाजता हा भूकंप झाला. या तीव्र धक्क्यानंतर अमेरिका आणि पॅसिफिक त्सुनामी इशारा केंद्राने किनारपट्टीच्या भागात एक मीटरपेक्षा जास्त उंचीच्या धोकादायक लाटा धडकण्याचा आणि मोठे नुकसान होण्याचा इशारा दिला आहे. हा त्सुनामीचा धोका पुढील काही तास कायम राहू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. फिलिपिन्स ज्वालामुखीशास्त्र आणि भूकंपशास्त्र संस्थेने (फिव्होल्क्स) देखील 7.8 तीव्रतेच्या या भूकंपानंतर नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भूकंपामुळे अनेक इमारतींना मोठे तडे गेले असून अनेक घरे कोसळल्याचे वृत्त आहे. जनरल सँटोस शहरात एका इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

फिव्होल्क्सचे प्रमुख टेरेसिटो बाकोलकोल यांनी किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ सुरक्षित आणि उंच ठिकाणी किंवा अंतर्गत भागात स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. या भूकंपाचे धक्के शेजारील देशांमध्येही तीव्रतेने जाणवले. इंडोनेशियाने आपल्या बोर्नियो बेटावरील कालीमंतन आणि सुलावेसीच्या काही भागांसह अनेक क्षेत्रांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. इंडोनेशियाच्या राष्ट्रीय हवामान संस्थेनुसार, येथे तीन मीटर उंचीपर्यंतच्या त्सुनामी लाटा येण्याची शक्यता आहे. इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी आणि उत्तर मालुकू प्रांतांतील नागरिकांनाही याचे जोरदार धक्के जाणवले. याशिवाय जपान, तैवान, ग्वाम, पापुआ न्यू गिनी आणि पश्चिम पॅसिफिकमधील अनेक बेट देशांमध्ये लहान आकाराच्या त्सुनामी लाटा धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्व संबंधित देशांतील प्रशासन सध्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.