पिझ्झा डिलिव्हरीचा बहाणा करून हिंदुस्थानी तरुणाची गोळ्या झाडून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेत तेलंगणाच्या अंशुल कुंचा या तरुणाची पिझ्झा डिलिव्हरीच्या बनावट ऑर्डरद्वारे सापळा रचून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

28 वर्षीय भारतीय तरुण अंशुल कुंचा पेनसिल्व्हेलिया राज्यातील फिलाडेल्फिया येथे मल्टिनॅशनल कंपनीत काम करत होता. अतिरिक्त उत्पन्नासाठी वीकेंडला तो पार्ट-टाईम पिझ्झा डिलिव्हरीचे काम करायचा. अंशुलला एका बनावट ऑर्डरद्वारे सापळ्यात अडकवून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे. शनिवारी रात्री त्याला एका ओसाड आणि निर्जन भागात पिझ्झा पोहचवण्याची ऑर्डर मिळाली. अंशुल जेव्हा त्या ठिकाणी पोहोचला, तेव्हा तिथे आधीच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात अंशुलचा जागीच मृत्यू झाला.

न्यूयॉर्कमधील हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासाने या घटनेची दखल घेतली असून अंशुलच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. अंशुलचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला जात आहे.

तुमच्या मुलांना अमेरिकेत पाठवू नका…

अंशुलची बहीण तन्वी हिने पालकांना आपल्या मुलांना परदेशात पाठवण्याबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. ती म्हणाली, माझा भाऊ खूप प्रेमळ आणि आनंदी होता. त्याला अमेरिकेत जायचे नव्हते. तरीही आम्ही त्याला पाठवले. त्यालाही जाण्याची इच्छा नव्हती, पण तो गेला आणि बघा त्याचे काय झाले. आपल्या मुलांना अमेरिकेत पाठवू नका.