
राज्याची ‘जीवनवाहिनी’ असलेल्या एसटीची बस स्थानके आणि बसगाड्या आता चकाचक दिसणार आहेत. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शुक्रवारी राज्यव्यापी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. मोहिमेंतर्गत दर चार तासांनी बस स्थानके आणि बसगाड्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात ‘लालपरी’चा प्रवास सुखकर होणार आहे.
एसटी बसगाड्या आणि स्थानकांच्या आवारातील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्याबाबत प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत महामंडळाने स्वच्छतेकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याच अनुषंगाने शुक्रवारी सकाळी परळ बस स्थानक येथे राज्यव्यापी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेंतर्गत संपूर्ण राज्यभरातील बस स्थानके आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वच्छता उपकरणांच्या सहाय्याने नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसेच बसगाड्या, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे यांची दर चार तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. एसटी महामंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात मंत्री सरनाईक यांनी स्वच्छता मोहिमेची घोषणा केली होती. त्या मोहिमेची शुक्रवारी सुरुवात करण्यात आली.
प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्यांचा पुनर्वापर
प्रत्येक बस स्थानकावर स्वच्छता मोहिमेदरम्यान आढळणाऱ्या प्लॅस्टिकच्या बाटल्या व पिशव्या संकलित करून त्या पुनर्वापर (रिसायकलिंग) करण्यासाठी पाठविण्यात येणार आहेत. या प्रक्रियेत विविध टिकाऊ व उपयुक्त उत्पादने तयार करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाने दिली.
विस्तारित चार्जिंग केंद्राचे भूमिपूजन
एसटी महामंडळाने सर्व 251 आगारांमध्ये ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित नऊ चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचे भूमिपूजनदेखील शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय नियंत्रक उपस्थित होते.






























































