
जागतिक बाजारातून मिळणारे नकारात्मक संकेत आणि शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजारात झालेली मोठी घसरण याचा परिणाम सोमवारी हिंदुस्थानी बाजारावर दिसून आला. सोमवारी बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत होते. त्यामुळे ज्याची भीती होती तेच घडले, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण दिसून आली आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यातील वेगवान क्षेपणास्त्र हल्ले आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली अचानक वाढ यांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्येही मोठी उलथापालथ झाल्याचे दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स उघडताच जवळपास ८०० अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीदेखील २५० हून अधिक अंकांनी खाली आला. त्यानंतर 12.30 वाजण्याच्या सुमारास बाजार सावरताना दिसत आहे.
इराण-इस्रायल यांच्यातील संघर्ष वाढत असून क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. त्यामुळे घबराट पसरली असून शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. जपानपासून कोरियापर्यंतच्या आशियाई शेअर बाजारांमधील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक उघडताच कोसळले.
सोमवारी शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स त्याच्या आदल्या दिवसाच्या ७४,२४३ च्या बंद भावापेक्षा ८२२ अंकांनी घसरून ७३,४२१ वर उघडला आणि नंतर अचानक ७३,३१८ पर्यंत खाली आला. एनएसई निफ्टीने सेन्सेक्सचेच अनुकरण करत आदल्या शुक्रवारच्या २३,३६६ च्या बंद भावापेक्षा २८६ अंकांनी घसरून २३,०८० वर उघडला. मात्र, त्यानंतर दोन्ही निर्देशांक सावरले, पण एका तासानंतर सेन्सेक्स ५५० अंकांनी खाली होता.
सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास दोन्ही निर्देशांक सावरण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी सेन्सेक्स 349.75 अंकांच्या म्हणजेच 0.47 टक्के घसरणीसह 73,893.59 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 115.45 अंकांच्या म्हणजेच 0.49 टक्क्यांच्या घसरणीसह 23,251.25 वर व्यवहार करत होता.
शेअर बाजारातील या लक्षणीय घसरणीच्या पार्श्वभूमीवर, अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स उघडताच मोठ्या प्रमाणात घसरले. बीएसई लार्जकॅप निर्देशांकाकडे पाहिल्यास, इटरनल शेअर (२.५०%), टीसीएस शेअर (२.१०%), एम अँड एम शेअर (२.०५%), एचडीएफसी बँक (१.५०%), आणि रिलायन्स शेअर (१.२५%) घसरणीसह व्यवहार करत होते.
शेअर बाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाची पुन्हा वाढलेली तीव्रता. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात, ब्रेंट क्रूडच्या किमती जवळपास ४ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ९६ डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. डब्ल्यूटीआय क्रूडच्या किमतीही जवळपास ९४ डॉलरवर असून त्यातही अशीच वाढ झाली आहे.
जपानमध्ये, निक्केई निर्देशांक जवळपास २,८०० अंकांनी, म्हणजेच सुमारे ५ टक्क्यांनी खाली होता. त्याच वेळी, हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांकही सुमारे २८० अंकांनी घसरला होता, तर दक्षिण कोरियाच्या कोस्पी निर्देशांकातही मोठी घसरण झाली आणि तो सुमारे ४०० अंकांनी किंवा ४ टक्क्यांनी खाली होता.




























































