
महायुती सरकारने जाहीर केलेले शेतकरी कर्जमाफी ही फसवी आहे. ही सरसकट कर्जमाफी नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त योजना आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथे केली. महायुती सरकारने आघाडी सरकारच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाखो शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे सरकार सांगत असलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष लाभार्थ्यांची संख्या खूपच कमी राहील. ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आणि फसवी कर्जमाफी असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
यंदाचा उन्हाळा हा महाराष्ट्रासाठी त्रासदायक ठरला आहे. त्यात लांबलेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मान्सूनचे संकट या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यासमोरील विविध समस्यांवर सर्वसमावेशक चर्चा होणे आवश्यक असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
देशासमोर उभ्या राहिलेल्या गंभीर आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक संकटांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांमधील वाढता आक्रोश, पेपरफुटीच्या घटना, परीक्षा व निकाल प्रक्रियेतील गोंधळ, महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे विस्कळीत झालेले जीवन, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किंमती यासह महत्वाच्या विषयांवर बैठकीत सखोल चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
देशातील तरुण रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करत आहेत. शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या सर्व प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी इंडिया आघाडी एकजुटीने पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.































































