
दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना जाब विचारल्याच्या वादातून चौघांवर चॉपरने हल्ला केल्याची घटना आज मालाड पूर्व येथे घडली. चाकू हल्ल्यात आकाश धोत्रे या तरुणाचा मृत्यू झाला, तर रमेश धोत्रे, अमित मिश्रा आणि आतिश सिंग हे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी महेंद्र शहाणी आणि वीरेंद्र शहाणी या दोन भावांना कुरार पोलिसांनी अटक केली.
मालाडच्या आप्पा पाडा येथे महेंद्र आणि वीरेंद्रची दहशत आहे. रविवारी दुपारी ते चॉपर घेऊन स्थानिक रहिवाशांना दमदाटी करत होते. त्याचा जाब विचारला म्हणून त्याने आकाश, रमेश, अमित आणि आकाशवर चॉपरने हल्ला केला. त्या हल्ल्यात ते चौघेही गंभीररीत्या जखमी झाले. या घटनेची माहिती समजताच कुरार पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या चौघांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले, तर रमेश, अमित आणि आतिशवर उपचार करण्यात आले. चाकू हल्ला केल्यानंतर महेंद्र आणि वीरेंद्र हे दोघे पळून गेले. त्या दोघांना कुरार पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्या दोघांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.




























































