नेरळ विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी भागवली आदिवासी पाड्यांची तहान, १९९५-९६ च्या बॅचचे विद्यार्थी धावले; टँकरने पुरवले पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कडकडत्या उन्हामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. याचा फटका सर्वांनाच बसत आहे. या परिस्थितीत नेरळ विद्या मंदिर शाळेच्या १९९५-९६ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी पाड्यांची तहान भागवली. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील मोहाचीवाडी परिसरालगत असलेल्या फणसवाडी, आनंदवाडीसह इतर वाड्यांमध्ये टँकरने पाणी पोहोचवून त्यांनी नागरिकांना मोठा दिलासा दिला.

ग्रामीण भागात दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून माता-भगिनींना पाणी आणावे लागत आहे. नेरळ परिसरातील दुर्गम वाड्यांमध्ये तर पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. अशा परिस्थितीत नेरळ विद्या मंदिर शाळेच्या १९९५-९६ बॅचमधील प्रीतम गोरे, प्रमोद डबरे, आनंद मरे, संजय गवळी यांच्यासह माजी विद्यार्थी एकत्र आले आणि पाणीटंचाईग्रस्त भागातील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा त्यांनी संकल्प केला.

या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून मदतीसाठी धावून आलेल्या माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

डोक्यावरचे हंडे उतरले

काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्याने किंवा पाण्याची पातळी घटल्याने महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. हीच अडचण ओळखून नेरळ विद्या मंदिर शाळेच्या १९९५-९६ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत नागरिकांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला. मोहाचीवाडी, फणसवाडी, आनंदवाडी आदी आदिवासी पाड्यांवर टँकर पोहोचल्याने महिलांच्या डोक्यावरचे हंडे उतरले.