मतांवर चोऱ्या आणि दरोडे टाकून आलेल्या सरकारला हटवणं हाच इंडिया आघाडीचा अजेंडा – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपप्रमाणे आम्ही मतं चोरून सत्तेत येणार नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच मतांवर चोऱ्या आणि दरोडे टाकून आलेल्या सरकारला हटवणं हाच इंडिया आघाडीचा अजेंडा असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीत आपसांत लढत नाहिये. आम्ही 2029 च्या निवडणुकीची तयारी करतोय. आज इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक आहे. या बैठकीला आघाडीतले सर्व मित्र पक्ष सामील होणार आहेत. आणि ज्यांना या बैठकीला उपस्थित राहता येणार नाही ते व्हर्च्युअली उपस्थित राहतील. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला व्हर्च्युअली उपस्थित राहतील. इंडिया आघाडी एकजूट आहे आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पुढची रणनीती ठरवतील. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय झाला म्हणून त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. ते म्हणत होते की इंडिया आघाडीत उरलंय काय? इंडिया आघाडीत काय उरलंय हे आता 2029 मध्येच कळेल. ज्या पद्धतीने भाजपने चोरी आणि दरोडे घालून निवडणुका जिंकल्या आहेत, त्या आम्ही नाही करणार. तुम्ही जिंकले कसे याचे आत्मचिंतन करा. इंडिया आघाडी अशा प्रकारचे घृणास्पद कार्य कधीही करणार नाही. आम्ही थेट भाजपशी लढू आणि त्यांना हरवू. 2029 ला निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा एक चेहरा पुढे घेऊन जावं लागेल. उद्धव ठाकरे यांची ही भूमिका आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

अखिलेश यादव यांनी जर काही म्हटलं असेल तर त्यात नक्की काहीतरी तथ्य आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळं दिसलं आहे. दानपेटीशी कशी छेडछाड केली हे सीसीटीव्हीमध्ये दिसतंय. त्याच आधारावर अखिलेश यादव यांनी ते विधान केले आहे.

आजची बैठक अत्यंत महत्वाची आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी ही बैठक आयोजित करायला लावली. ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीपासून दूर राहिल्या. पण पश्चिम बंगालच्या निवडणुकीपासून विरोधकांची एकजूट असायला पाहिजे ही बाब बॅनर्जी यांना पटली आहे. ममता बॅनर्जी स्वतः दिल्लीत पोहोचल्या आहेत. उद्धव ठाकरे मुंबईतून सामील होतील.

इंडिया आघाडीचा अजेंडा एकच आहे. या देशावर भ्रष्ट मार्गाने आणि वाम मार्गाने, मतांवर चोऱ्या आणि दरोडे टाकून एक सरकार आले आहे. ते सरकार हटवणं आणि देशाच्या जनतेला मोकळा श्वास घेण्याची संधी उपलब्ध करून देणं हा अजेंडा आहे. इंडिया आघाडी विखुरलेली नाही. आघाडीतले प्रमुख पक्ष आजही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सामील आहोत.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची कायम भूमिका राहलेली आहे की, निवडणुकीला सामोरं जाताना आपण एक चेहरा समोर आणला पाहिजे. पण महाविकास आघाडी जेव्हा निवडणुकीला सामोरी गेली, तेव्हाही हा चेहरा सांगायला आणि जाहीर करायला उशीर लावला याचाही आपल्याला फटका बसला. पंतप्रधानपदाचा चेहरा घेऊन आपण 2024 साली निवडणूक लढवली पाहिजे अशी आमची भूमिका होती. 2029 साली निवडणुकीला सामोरं जाताना आपला चेहरा समोर ठेवून लोकांकडे गेलं पाहिजे.

छगन भुजबळ राज्यसभेवर जायला इच्छूक होते. पण आपल्या पुतण्याला मंत्रीपद द्यावे अशी भुजबळांची अट होती. यावर संजय राऊत म्हणाले की, प्रफुल पटेल यांची अट मान्य झाली आणि त्यांचा माणूस राज्यसभेचा उमेदवार झाला. अटी आणि शर्थींवर तुम्ही राज्यसभेवर कसे जाऊ शकता? आणि भुजबळ एवढे ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांची अट मान्य व्हायला पाहिजे होती. आता अट का मान्य नाही झाली यावर छगन भुजबळच खुलासा करू शकतील, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.