
मेहकर जवळ समृद्धी महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एका खाजगी ट्रॅव्हल्सने समोर जाणाऱ्या अज्ञात ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल्समधील एकूण 25 प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी 15 जण गंभीर तर 12 जण किरकोळ जखमी आहेत. जखमींवर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींवर प्राथमिक उपचारानंतर नातेवाईक खाजगी व इतरत्र उपचारासाठी घेऊन गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक 08 जून 2026 रोजी पहाटे 4.21 वाजण्यापूर्वी समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवर चॅनल नंबर 278.800 (पोलीस स्टेशन मेहकर अंतर्गत) जवळ हा अपघात घडला. खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन पुणे येथून नागपूरच्या दिशेने जात होती. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स समोर चाललेल्या एका अज्ञात ट्रकला पाठीमागून धडकली. अपघातानंतर अज्ञात ट्रकचालक वाहन घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. कंट्रोल रूम छत्रपती संभाजीनगरकडून माहिती मिळताच समृद्धी महामार्ग उपकेंद्र फर्दापूरचे पोलिस उपनिरीक्षक अरविंद तिरणकर यांच्यासह पोलीस कर्मचारी व मेहकरचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, उपनिरीक्षक कांचन जारवाल, पोलीस कर्मचारी अवघ्या 8 मिनिटांत म्हणजेच पहाटे 4.30 वाजता घटनास्थळी पोहोचले. अपघाताची भीषणता पाहून तातडीने ‘108’ रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली. यामध्ये स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संतोष मलोसे यांनीही मदतकार्यात मोठी भूमिका बजावली.
सर्व जखमींना तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला लावून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत केली आहे. सकाळी 09:00 वाजेपर्यंत पोलिसांनी घटनास्थळावरील सर्व आवश्यक कारवाई पूर्ण केली असून, मेहकर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे
प्रणाली उमेश खोरगडे (वय 33, खापरखेडा), अभय श्याम पवनिकार (वय 24, पुणे), आमरा झैब हुसेन (वय 16, नागपूर), सुमन रॉय (वय 39, नागपूर), शुभांगी सचिन बेनवाल (वय 47, नागपूर), रितेश प्रल्हाद किंकरे (वय 29, बुलढाणा), प्रथा सुनील शर्मा (वय 29, नागपूर), वंदना चंद्रशेखर शेंद्रे (वय 56, नागपूर), प्रदिप जी. तागे (वय 50, नागपूर), यश बैनलवार (वय 18, नागपूर), पुरुषोत्तम शिवाजी भिमान (वय 38, चंद्रपूर), मधू अनिल तैलानी (वय 51, नागपूर), अरुणा दिनेश महोरे (वय 54, नागपूर), अनिल तोमल तैलानी (वय 57, नागपूर), अमोल मधुकर साळुंके (वय 35, नागपूर), शुभम सावळाराम सिरसाट (वय 30, बीड), नाझ झैब हुसेन (वय 41, नागपूर), अस्का झैब हुसेन (वय 9, नागपूर), सक्षम खोरगडे (वय 13, खापरखेडा), युविका खोरगडे (वय 8, खापरखेडा), चांदणी खमाने (वय 8, नागपूर), सुरज लक्ष्मण मोरे (वय 43, नागपूर), विलासू भगवान काके (वय 65, पुणे), प्रांजली प्रमोद लुटे (वय 7, नागपूर), संभाजी राजाराम वाळूज (वय 41, अहिल्यानगर), प्रकाश भास्कर कपागार (वय 31, अहिल्यानगर) आणि चंद्रशेखर रामकृष्ण शिंदे (वय 60, नागपूर) हे जखमी झाले आहेत.





























































