
ठाणे महापालिकेचा अजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एका नामांकित संस्थेने व्याख्यानमालेसाठी महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृह भाडेतत्त्वावर घेतले. त्यासाठी लागणारी अनामत व भाड्यापोटी रक्कमदेखील भरली, मात्र प्रशासनाने आयत्यावेळी सभागृहाचे बुकिंग रद्द केल्याने संस्थेवर नामुष्की ओढवली आहे. तसेच भाडे परताव्यासाठी 40 फेऱ्या मारूनदेखील पैसे मिळत नसल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे.
ठाण्यातील थिऑसॉफिकल फेडरेशन एक मोठी सामाजिक संस्था आहे. संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. मराठी थिऑसॉफिकल फेडरेशनशी संलग्न असलेल्या ‘ठाणे लॉज’ या संस्थेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून जे. कृष्णमूर्ती यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ व्याख्याते किशोर खैरनार यांच् व्याख्यान ठेवण्यात आले होते. यासाठी ठाणे पालिकेच्य मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृह 18 व 19 एप्रिल असे दोन दिवस आगाऊ नोंदणी करून व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी भाडेतत्त्वावन घेतले होते. यासाठी अनामत रक्कम 7 हजार 500 तर भाडे 10 हजार 856 रुपये भरण्यात आले. परंत जनगणनेच्या कामामुळे सभागृह देता येणार नाही असे प्रशासनांकडून आदल्या दिवशी कळवण्यात आल्यानंत आयोजकांच्या पायाखालची वाळू सरकली.































































