
मंत्री गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरूनच मी उमेदवारी अर्ज भरला. माघारीबाबत अद्याप महाजन किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कुठलीही सूचना नाही, असा गौप्यस्फोट नाशिक विधान परिषदेचे भाजपचे अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे यांनी केला. एकनाथ शिंदे गटाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांची अडचण भाजपनेच केल्याचे अधोरेखित झाले आहे.
शिंदे गटाकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते, भाजपचे प्रसाद हिरे या दोघांनी अपक्ष उमेदवारी करून महायुतीत बंडखोरी केली आहे. रविवारी प्रसाद हिरे यांनी भाजप कार्यालयात बोलताना गौप्यस्फोट केला. महाजन व मुख्यमंत्री फडणवीस या दोघांनीही मला अद्याप माघार घेण्याबाबत सूचना केलेली नाही. माझे पक्षश्रेष्ठी असलेल्या या दोन्ही भाऊंच्या शब्दापलीकडे मी नाही. माघार घ्यायला सांगितलीच तर मला मतदार आणि सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल, असेही हिरे यांनी सांगितले.
मी भाजप किंवा शिंदे गटाच्या विरोधात नाही, पण मी भाजपचाच आहे, भाजपातच राहील. दराडे हे महायुतीचे नाही तर शिंदे गटाचे उमेदवार आहेत. माझी बंडखोरी असंस्कृत व असामाजिकपणाने होत असलेल्या निवडणुकीविरुद्ध आहे. संस्कृतपणाने, संविधानाने, प्रेमाने मी मतदारांची मने जिंकली आहेत. दराडे यांनी मतदारांशी प्रतारणा केली आहे, ते कुचकामी आहेत, यामुळे मला ते पसंद नाहीत, असेही हिरे यांनी स्पष्ट केले.





























































