
मध्य प्रदेशातील शेओपूर जिह्यातील प्रसिद्ध ‘कुनो नॅशनल पार्क’मध्ये अनेक दशकांनंतर ‘कॅराकल’ नावाचे अत्यंत दुर्मिळ आणि लाजाळू प्रजातीचे जंगली मांजर आढळले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या कॅमेरा-ट्रॅप सर्वेक्षणादरम्यान हे मांजर कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
दुर्मिळ ‘कॅराकल’च्या दर्शनानंतर वन्यजीवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या दुर्मिळ जंगली मांजराचे फोटो सोशल मीडियावरून जाहीर करत आनंद व्यक्त केला.
‘प्रोजेक्ट चित्ता’चा परिणाम
कुनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून चित्ते आणून सोडल्यानंतर येथील तिथल्या परिसंस्थेला बळकटी मिळाली आहे. कुनोच्या जंगलात गेल्या काही दशकांत न दिसलेले अनेक दुर्मिळ वन्यजीव पुन्हा दिसू लागले असून, कॅराकल हा पुनरागमन करणारा चौथा मोठा दुर्मिळ जीव ठरला आहे.
‘कॅराकल’ मांजराची वैशिष्ट्ये
‘कॅराकल’ हे उडणारे मांजर म्हणून ओळखले जाते. कॅराकल हे हवेत तब्बल तीन मीटर (सुमारे 10 फूट) उंच उडी मारून उडणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यात पटाईत असते. हे मांजर मध्यम आकाराचे असून त्याचे पाय लांब, कान टोकदार व त्यावर काळ्या रंगाचे केसांचे तुरे असतात. हिंदी भाषेत त्याला ‘सियाहगोश’ असे म्हटले जाते. हिंदुस्थानात ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या अनुसूची-1 अंतर्गत याला सर्वोच्च संरक्षण प्राप्त आहे.
































































