
फक्त 6 हजार रुपये मासिक वेतनावर सरकारी नोकरी सुरू करणाऱ्या ओडिशाच्या बैकुंठनाथ बेहरा याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता सापडली आहे.
ओडिशा दक्षता विभागाला बेहरा यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर भुवनेश्वर येथील विशेष न्यायाधीश (दक्षता) यांच्या शोध वॉरंटच्या आधारे दक्षता विभागाने शुक्रवारी भुवनेश्वर, जाजपूर, बारीपदा आणि कंधमाल जिह्यातील एकूण 9 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. यावेळी 5 बहुमजली इमारती, 13 भूखंड, सोन्याचे दागिने आणि बँक लॉकरमधून सुमारे 2.4 कोटी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बैकुंठ नाथ कंधमाल जिह्यातील बलिगुडा येथील एकात्मिक आदिवासी विकास संस्थाचा सहाय्यक कार्यकारी अभियंता आहे.
या कारवाईत 2 अतिरिक्त एसपी, 5 डीएसपी, 6 इन्स्पेक्टर आणि मोठ्या संख्येने इतर अधिकारी सहभागी होते. आतापर्यंतच्या तपासणीत पाच मोठ्या इमारतींचा शोध लागला आहे. यापैकी भुवनेश्वरमधील नीलाद्री विहार येथील सुमारे 10,500 चौरस फूट क्षेत्रफळाची चार मजली इमारत सर्वात मोठी आहे. जाजपूर जिह्यातील धर्मशाळा येथे वडिलोपार्जित जमिनीवरही दोन मजली इमारत बांधलेली आहे. दक्षता विभागाला बेहरा आणि त्याच्या कुटुंबाच्या नावावर 13 भूखंडही मिळाले आहेत. यापैकी 7 भूखंड भुवनेश्वरमध्ये, 5 जाजपूर जिह्यातील धर्मशाळा येथे आणि एक बारीपदा येथे आहे. तसेच भुवनेश्वरमध्ये आणखी जमीन असल्याचे समजते.



























































