पुनर्विकासाच्या दिरंगाईचा केक कापून, ढोलताशे वाजवून उपहासात्मक जल्लोष, शिवकृपा रहिवाशांचा 20 वर्षांचा संघर्ष संपेना!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेली 20 वर्षे हक्काच्या घरापासून वंचित राहिलेल्या प्रभादेवीतील शिवकृपा सोसायटीच्या 100 विस्थापित कुटुंबांनी आता पुनर्विकासासाठी एल्गार पुकारला. ‘आश्वासन नको, घर हवे!’ अशी आक्रमक भूमिका घेत प्रभादेवी येथील शिवकृपा रहिवाशांनी आपल्या हक्कासाठी केक कापून, ढोलताशे वाजवून आणि फटाके फोडून उपहासात्मक जल्लोष केला.

1970 साली तळ अधिक चार मजली शिवकृपा सोसायटीची स्थापना झाली. या इमारतीत जवळपास 100 कुटुंबांचे वास्तव्य करत होते. मात्र विकासकामांसाठी तेथील रहिवाशांना जास्त मोबदला देण्याचे आश्वासन देऊन ती इमारत रिकामी करण्यास भाग पाडले. 2006 मध्ये काही रहिवाशांनी घरे सोडली. ही इमारत पूर्ण रिकामी झाल्यानंतर 2010 मध्ये ती जमीनदोस्त करण्यात आली. 20 वर्षे उलटली तरी तेथे अद्याप इमारतीसाठी एकही वीट रचलेली नाही. 3 वेळा भूमिपूजन करण्यात आले. मात्र काम शून्य राहिल्याने रहिवासी हतबल झाले आहेत. याबाबत स्थानिकांनी म्हाडाकडे पत्रव्यवहार करून घरांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. मात्र अजूनपर्यंत त्यावर तोडगा निघालेला नाही.

शिवसेनेने दिला दिलासा

शिवसेनेचे आमदार महेश सावंत, नगरसेवक निशिकांत शिंदे व मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी रहिवाशांची भेट घेतली. त्यांनी रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार सावंत यांनी रहिवाशांना दिले.