
शहरीकरण आणि विकासकामांमुळे मुंबईसह उपनगरांमधील प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिका ऍक्शन मोडवर आली आहे. प्रशासनाने हवेची गुणवत्ता खालावण्यास आणि प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या 835 बांधकामांना ‘स्टॉप वर्क’ म्हणजेच काम थांबवण्याच्या नोटीस बजावत दणका दिला आहे. या कारवाईदरम्यान प्रशासनाने तीन हजारहून अधिक ठिकाणी झाडाझडती घेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 977 साईट्सना ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने बांधकाम क्षेत्रासाठी 28 नियमांची कठोर मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. यामध्ये बांधकाम ठिकाणी स्प्रिंकलर उभारणे, 35 फूट उंच पडदे लावणे आणि हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी सेन्सर्स बसवणे यांसारख्या उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत, मात्र अनेक ठिकाणी या नियमांचे पालन होत नसल्याचे तपासणीत समोर आले आहे. नियम न पाळणाऱ्यांना आधी कारणे दाखवा नोटीस दिली जाते, आणि त्यानंतरही सुधारणा न झाल्यास थेट ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून देण्यात आली.
केवळ दंडात्मक नव्हे, सुधारात्मक पावले!
पर्यावरण संवर्धनासाठी पालिकेने केवळ दंडात्मक कारवाई न करता प्रतिबंधात्मक आणि सुधारात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे. मुंबईकरांना आरोग्यदायी हवा मिळावी आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा, हाच या मोहिमेचा उद्देश असल्याचे पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.
ऑटोडीसीआरनुसार आणि वॉर्डमधून गोळा केलेल्या माहितीनुसार एकूण साईट्सची संख्या – 3093
बांधकाम स्थळांवर बसवलेल्या सेन्सर आधारित हवा गुणवत्ता मॉनिटरची संख्या – 2938
केंद्रीय सर्व्हर आणि मॉनिटरिंग डॅशबोर्डशी जोडलेल्या सेन्सरची संख्या – 2885
























































