
दक्षिण हिंदुस्थानातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा असलेल्या भाविकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदी बातमी आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने म्हणजेच आयआरसीटीसीने एका विशेष धार्मिक टूर पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजअंतर्गत प्रवाशांना भारत गौरव टुरिस्ट ट्रेनद्वारे दक्षिण हिंदुस्थानातील अनेक प्रमुख मंदिरांचे दर्शन घेता येणार आहे. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान भाविकांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची आणि फिरण्याची संपूर्ण सोय रेल्वे प्रशासनाकडून केली जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक उत्तम पर्वणी ठरणार आहे.
आयआरसीटीसीने या विशेष टूर पॅकेजला ‘दिव्य दक्षिण यात्रा विद अरुणाचलम’ असे नाव दिले आहे. या टूर पॅकेजचा कोड एससीझेडबीजी-63 असा आहे. ही संपूर्ण यात्रा एकूण 9 दिवस आणि 8 रात्रींची असणार आहे. या विशेष ट्रेनमध्ये एकूण 702 प्रवाशांची बसण्याची सोय करण्यात आली आहे. यामध्ये स्लीपर क्लास, थर्ड एसी आणि सेकंड एसी अशा तीनही श्रेणींचा समावेश आहे. या प्रवासाची सुरुवात 20 जुलै रोजी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून होणार आहे. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने चारलापल्ली, जंगांव, काजीपेट, वारंगल, महबूबाबाद, खम्मम, माधिरा, विजयवाडा, तेनाली, ओंगोल, नेल्लोर, गुडूर आणि रेणिगुंटा या इतर अनेक महत्त्वाच्या स्थानकांवरूनही ट्रेनमध्ये चढण्याची आणि उतरण्याची सुविधा दिली आहे.
Embark on a soul-stirring journey through the sacred temples and timeless heritage of South India with IRCTC’s Bharat Gaurav Tourist Train – Divya Dakshin Yatra with Arunachalam.https://t.co/GKHvUK1KQJ
(package Code=SCZBG63)#Tamilnadu @RailMinIndia pic.twitter.com/hZkKZUXCKq
— IRCTC Bharat Gaurav Tourist Train (@IR_BharatGaurav) June 2, 2026
या 9 दिवसांच्या आध्यात्मिक प्रवासात भाविकांना दक्षिण हिंदुस्थानाली अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक अशा 7 प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन घेता येणार आहे. यामध्ये तिरुवन्नामलाईचे प्रसिद्ध अरुणाचलेश्वर मंदिर, चिदंबरमचे नटराज मंदिर, त्रिचीचे श्री रंगनाथस्वामी मंदिर, तंजावुरचे बृहदेश्वर मंदिर, रामेश्वरमचे श्री रामनाथस्वामी मंदिर आणि मदुराईचे मीनाक्षी अम्मन मंदिर यांचा समावेश आहे. या यात्रेचा शेवटचा टप्पा कन्याकुमारी येथे असेल, जिथे प्रवाशांना कुमारी अम्मन मंदिराचे दर्शन घेता येईल आणि त्याचसोबत समुद्रातील प्रसिद्ध विवेकानंद रॉक मेमोरियल पाहण्याची संधीही मिळेल.
या प्रवासाचे भाडे भाविक निवडत असलेल्या श्रेणीनुसार ठरवले जाईल आहे. प्रौढ प्रवाशांसाठी स्लीपर क्लासचे भाडे 15,600 रुपये, थर्ड एसीचे 23,100 रुपये आणि सेकंड एसीचे 29,500 रुपये ठेवण्यात आले आहे. लहान मुलांसाठी रेल्वेने दरामध्ये काहीशी सवलत दिली असून 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी स्लीपर क्लासचे तिकीट 14,600 रुपये, थर्ड एसीचे 21,900 रुपये आणि सेकंड एसीचे 28,100 रुपये निश्चित केले आहे.
प्रवासी तिकीटातच मूलभूत सुविधांचा समावेश
महत्त्वाचे म्हणजे तिकिटाच्या दरामध्येच प्रवाशांच्या सर्व मूलभूत सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना रोजचा सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे शाकाहारी जेवण रेल्वेमार्फत दिले जाईल. यासोबतच सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्व प्रवाशांना प्रवास विमा म्हणजेच ट्रॅव्हल इन्शुरन्स दिले जाणार आहे. संपूर्ण यात्रेदरम्यान प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रशिक्षित टूर एस्कॉर्ट्सची टीम देखील ट्रेनमध्ये सोबत असणार आहे. दक्षिण हिंदुस्थानची ही सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सफर घडवून आणणारी ट्रेन भाविकांसाठी अत्यंत सोयीची ठरणार असून या यात्रेच्या बुकिंगसाठी भाविक आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
मुंबई, महाराष्ट्रातून जर कोणाला ही टूर करायची असेल तर त्यांना आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा ऑफिसमध्ये भेट देणे गरजेचे आहे.



























































