
केरळम मधील कोझिकोड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका ४३ वर्षीय व्यक्तीची निपाह व्हायरस संसर्गाची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर केरळ राज्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंतिम निदानासाठी नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही – NIV) पाठवण्यात आले असून, त्याचा निकाल लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्य विभागाने फारोख (Feroke) येथील व्यावसायिक असलेल्या या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याची आणि त्यांना विलगीकरणात ठेवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या या व्यक्तीला बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले असून सध्या तो व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे.
निपाह व्हायरस हा वटवाघळांमुळे (फ्रूट बॅट्समुळे) पसरतो आणि केरळममध्ये २०१८ पासून याचे अनेक रुग्ण समोर आले आहेत.
आरोग्य मंत्री के. मुरलीधरन यांनी पत्रकारांना सांगितले की, कोझिकोडमधील आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘अंतिम खात्रीसाठी एनआयव्हीच्या (NIV) निकालाची प्रतीक्षा आहे. परंतु, लक्षणे आणि प्राथमिक चाचणीच्या आधारे हे निपाहचेच संकेत देत आहेत’, असे ते म्हणाले.
मुरलीधरन यांनी सांगितले की हा रुग्ण अनेक लोकांच्या संपर्कात आला होता.
‘त्याने सुरुवातीला एका रुग्णालयाच्या ओपीडी सेक्शनला भेट दिली होती. त्यानंतर त्याची एमआरआय आणि इकोकार्डियोग्राफी चाचणी देखील करण्यात आली. आम्ही संबंधित आरोग्य कर्मचारी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर संभाव्य लोकांना क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितले आहे’, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, परिस्थिती हाताळण्यासाठी कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
‘या टप्प्यावर घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. या रुग्णाने नुकतेच एक गोडाऊन भाड्याने घेतले होते आणि ते स्वतःच साफ केले होते. आम्हाला संशय आहे की, याच प्रक्रियेदरम्यान त्याला हा संसर्ग झाला असावा’, असे मुरलीधरन यांनी सांगितले.
मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाला सुरुवातीला ताप आला होता जो नंतर कमी झाला, पण तो पुन्हा परत आल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.
‘तो एक छोटा व्यवसाय करतो आणि त्याच कामासाठी त्याने ते गोडाऊन भाड्याने घेतले होते’, असे त्यांनी पुढे सांगितले.
मुरलीधरन यांनी सांगितले की, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते गुरुवारी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत एका बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. रुग्णाचा रूट मॅप तयार करण्याचे आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे; तसेच ही संपर्कातील लोकांची यादी खूप मोठी आहे, असेही ते म्हणाले.
‘मेडिकल कॉलेजमध्ये औषधे उपलब्ध आहेत. एनआयव्हीचा (NIV) चाचणी अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील,’ असे त्यांनी स्पष्ट केले.



























































