Crime News – गाडीत आईस्क्रिम सांडलं अन् निर्दयी प्रियकराने चिमुकलीला संपवलं, आई फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्च महिन्यात 6 वर्षांच्या पी. वेन्नेला या चिमुरडीच्या मृत्यू झाला होता. मात्र, तिचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा शोध पोलीस मागील अनेक महिन्यांपासून घेत होते. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. तिची आई प्रियांका हिचा लिव्ह-इन पार्टनर मोहन जी.एन. याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. 24 मार्चच्या रात्री हॉटेलमधून परतत असताना वेन्नेलाने गाडीत आईस्क्रीम सांडले आणि ती दुसऱ्या आईस्क्रीमसाठी रडू लागली. यावरून संतापलेल्या मोहनने तिच्या पोटात जोरात कोपर मारला आणि तिचा आवाज दाबण्यासाठी तोंड घट्ट दाबले. या मारहाणीमुळे अंतर्गत दुखापत होऊन आणि गुदमरून तिचा मृत्यू झाला.

News 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, मृत वेन्नेला ही प्रियांका आणि तिचा पती प्रवीण (रा. दावणगेरे) यांची मुलगी होती. प्रियांका व्यवसायाने वकील असून, कॉलेजमधील जुना मित्र मोहन याच्याशी पुन्हा जवळीक वाढल्याने ती प्रवीण यांच्यापासून वेगळी झाली होती. प्रवीण यांच्या आरोपानुसार, प्रियांकाने त्यांना जबरदस्तीने घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले होते. दुसरीकडे, बिल्डर असलेला मोहन स्वतः विवाहित असून त्याला दोन मुले आहेत, परंतु तो आपल्या कुटुंबाला सोडून प्रियांकासोबत बेंगळुरूमधील एका आलिशान व्हिलामध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होता.

मुलगी बेपत्ता किंवा तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने तिचे वडील प्रवीण यांनी तक्रार दाखल केली होती. या खुनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 4 जून रोजी मोहनला अटक केली असून सध्या तो 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. गुन्हा घडला त्या वाहनाची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील मृत मुलीची आई प्रियांका सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. प्रवीण हे सध्या त्यांच्या मोठ्या मुलीसोबत दावणगेरे येथे राहत आहेत.