
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोळवली गणपती मंदिरासमोर, हॉटेल सनराईजच्या उजव्या बाजूस सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे निर्माण झालेला मोठा खड्डा गेल्या सहा महिन्यांपासून वाहनचालकांच्या जीवावर उठला आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महामार्गाचे काम सुरू असल्याच्या नावाखाली हा धोकादायक खड्डा उघड्यावर सोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था, इशारा फलक किंवा रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशयोजना नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
दररोज हजारो वाहने या मार्गावरून धावत असताना प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. अनेकदा नागरिकांनी तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे “राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि ठेकेदार आणखी एखादा अपघात होण्याची किंवा निष्पाप वाहनधारकाचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण आणि निकृष्ट कामांमुळे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. तरीही संबंधित यंत्रणांना जाग येत नसल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोळवली येथील हा धोकादायक खड्डा तातडीने भरून रस्ता सुरक्षित करण्यात यावा, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ प्रशासनावर येईल, असा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आला आहे.































































