रुपयाची घसरण! डॉलरच्या तुलनेत ३२ पैशांनी घसरून ९५.५७ वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे तणाव वाढला असून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने, गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ३२ पैशांनी घसरून ९५.५७ वर पोहोचला.

परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) मोठ्या प्रमाणावर काढलेला पैसा, देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण आणि डॉलर किरकोळ मजबूत झाल्यामुळे स्थानिक चलनावर अधिकच दबाव आला.

आंतरबँक परकीय चलन बाजारात (इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये) रुपया डॉलरच्या तुलनेत ९५.५५ वर उघडला आणि त्यानंतर तो आणखी घसरून ९५.५७ वर गेला.

अतिउतार-चढाव रोखण्यासाठी आणि रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) केलेल्या संभाव्य हस्तक्षेपामुळे, बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया १६ पैशांनी मजबूत होऊन ९५.२५ वर बंद झाला होता.

इराण आणि अमेरिकेने एकमेकांवर हल्ले केल्यानंतर तेलाच्या किमती वाढल्यामुळे रुपयाची सुरुवात कमकुवत झाली. सरकारी बँकांकडून होणाऱ्या डॉलरच्या विक्रीमुळे रुपयाला थोडा आधार मिळाला आहे, हा डॉलरचा पुरवठा बहुधा आरबीआयच्या सांगण्यावरून केला जात आहे, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.

‘तेलाच्या किमतींशिवाय, अमेरिकन शेअर्समध्ये झालेल्या आणखी एका घसरणीनंतर रुपयाला जोखीम असेलल्या वातावरणाचा सामना करावा लागेल. अमेरिकेतील महागाई वार्षिक ४.२ टक्क्यांवर पोहोचली असून, हा गेल्या तीन वर्षांतील सर्वोच्च स्तर आहे, परंतु मुख्य महागाई दर अपेक्षेपेक्षा कमी वाढल्यामुळे फेडरल रिझर्व्हच्या नजीकच्या काळातील व्याजदर बदलांच्या अपेक्षांमध्ये फारसा बदल झालेला नाही’, असे चॉईस ब्रोकिंगमधील कमोडिटी टेक्निकल रिसर्चचे कमोडिटी आणि करन्सी विश्लेषक आमीर मकडा यांनी सांगितले.

दरम्यान, जगातील प्रमुख सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर इंडेक्स ०.०१ टक्क्याने वाढून ९९.९५ वर व्यवहार करत होता.

जागतिक तेलाचा बेंचमार्क असलेल्या ब्रेंट क्रूडचा बाजार १.६५ टक्क्यांनी वाढून ९४.६४ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होता.

सेन्सेक्सची घसरण…

देशांतर्गत शेअर बाजाराचा विचार केला तर सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३५८.५४ अंकांनी घसरून ७३,६२४.६४ वर आला, तर निफ्टी ११७ अंकांनी घसरून २३,०९८.३० वर होता.

शेअर बाजारच्या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी (FII) बुधवारी निव्वळ २,१२४.९८ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.