सामना अग्रलेख – बेइमान बंडखोर झाले, तपपूर्तीची फलश्रुती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आता सोडून गेलेले तृणमूलचे सर्व आमदार, खासदार हे ममतांच्या नावावर निवडून आले. त्यांनी सत्तेचा पुरेपूर भोग घेतला व सत्ता जाताच भाजपवासी झाले. आता मोदी-शहा-सुवेंदू अधिकारी त्यांना चारित्र्यवान परमेश्वर वाटू लागले. ममतांनी संघर्षातून उभा केलेला तृणमूल काँग्रेस पक्ष या बेइमान लोकांना आयताच दिला जाईल. मोदींच्या तपपूर्तीने बेइमानांना दिलेली ही प्रतिष्ठा आणि सन्मान आहे, जे याआधी कधीच झाले नव्हते. मोदींच्या तपपूर्तीने देशातील बेइमानांना ‘बंडखोर’ बनवले. काय हे अचाट कार्य! देश या पडझडीतून पुन्हा एकदा उभा राहील. ममता बॅनर्जी यांनी बेइमानांच्या नाकदुऱ्या काढू नयेत. जायचे त्यांना जाऊ द्या. देशाला स्वाभिमान, देशाभिमानाची नवी पालवी फुटेल!

जे महाराष्ट्रात घडले तेच प. बंगालात तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत घडत आहे. कथा, पटकथा, दिग्दर्शन तेच आहे. फक्त पात्रांची नावे काय ती बदलली आहेत. तृणमूल काँग्रेसच्या 60 आमदारांनी आधीच ममता ‘दीदीं’चा त्याग करून स्वतंत्र गट स्थापन केला व आता 20 खासदारांनी बंडखोरी करून भाजपसोबत जाण्याचा पवित्रा घेतला आहे. लोकसभेत तृणमूल काँगेसचे 28 खासदार आहेत. त्यातील दोन तृतीयांश म्हणजे 20 खासदारांनी बंड केले (बेइमानी) व ‘आम्हीच मूळ तृणमूल काँग्रेस’ असा दावा केला आहे. बेइमान, गद्दारांना ‘बंडखोर’ म्हणण्याची नवी संस्कृती भाजप काळात सुरू झाली. दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी सहभागी होत असताना बाजूलाच भाजपचे लोक तृणमूल खासदार फोडण्याच्या उद्योगाला लागले होते. मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीस बारा वर्षे पूर्ण म्हणजे एक ‘तप’ झाल्याच्या निमित्ताने देशाच्या लोकशाहीला त्यांनी ही जणू भेटच दिली. महाराष्ट्राची वॉशिंग मशीन उचलून प. बंगालात नेली व तेथे सर्व भ्रष्ट तृणमूलवाले मशीनमध्ये टाकले. विधानसभा निकालांना जेमतेम एक महिना झाला व लगेच संपूर्ण तृणमूल ते भाजपमध्ये सामील करताना दिसत आहेत. आश्चर्य असे की, कालपर्यंत याच तृणमूल काँग्रेसने बंगालची लूट केली, भ्रष्टाचार केला, गुंडगिरी केली हे भाजपचे ठाम मत होते व आहे. तृणमूल हिंदूविरोधी व बांगलादेशींची पोशिंदी असे प्रचारात सांगितले. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी हे सर्व ठणकावून सांगितले व भाजपची सत्ता येताच हे सर्व प्रश्न संपवून टाकू असे वचन दिले. आता

‘भ्रष्ट’ आणि ‘बांगलादेशी समर्थक’

तृणमूल काँग्रेस भाजपमध्ये सामील करून सर्व प्रश्न जागच्या जागी मिटवून टाकले. भाजपचे राजकारण हे असे आहे. त्यात देश, देशभक्ती, दिलेला शब्द पाळणे याला महत्त्व नाही, तर आपली खुर्ची व आपली सत्ता यालाच महत्त्व आहे. भाजपला भ्रष्टाचाराशी काहीच देणेघेणे नाही. भ्रष्ट मार्गाने मिळवलेला पैसा हाच त्यांचा परमेश्वर आहे. सर्व भ्रष्टाचारी त्यांच्या मालमत्तेसह भाजपमध्ये सामील झाले की, त्यांचा विषय संपतो. जे ‘बेइमान’ (बंडखोर) आज ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, ममता बॅनर्जी यांनी भ्रष्टाचारास पाठिंबा दिला, अशी ओरड करीत आहेत, ते सर्व बेइमानदेखील त्याच ‘सिस्टीम’मधून आले आहेत! ममता बॅनर्जी यांनी त्यांना पदे-प्रतिष्ठा दिली व आता प. बंगालमधील सत्ता जाताच त्यांच्यातला ‘पवित्र बंडखोर’ जागा झाला. महाराष्ट्रात, प. बंगालात व सर्वत्रच हा नंगानाच सुरू आहे. मोदींनी काँग्रेसपासून मुक्तीची गर्जना केली होती. प्रत्यक्षात भाजपने स्वतःला काँगेसचे प्रतिरूप बनवले आहे. काँग्रेसच्या भ्रष्ट कारभारावर बोलणारे हे लोक स्वतःच भ्रष्टाचाराचे वटवृक्ष बनले आहेत. या वटवृक्षाखाली मोदी बारा वर्षांपासून तपाला बसले, पण त्यांना नैतिकतेचा बोध झाला नाही! सत्ता टिकवण्यासाठी ‘फोडा, झोडा, विकत घ्या’ हीच त्यांची भूमिका आहे. तृणमूल काँग्रेस फोडण्यासाठी दहशत, धमक्या, पैसा व तपास यंत्रणांचा वापर झाला. तृणमूलच्या स्थानिक नेत्यांवर हल्ले होत आहेत व त्यांची धिंड काढली जात आहे. विरोधकांशी वागण्याची ही कोणती रीत? याचे उत्तर पंतप्रधान मोदी यांनी द्यायला हवे. जनतेने ममता यांच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध संताप व्यक्त केला हे मोदी-शहा-सुवेंदू अधिकारींचे म्हणणे खरे मानले तर मग त्या

भ्रष्टाचाराचे शेण

आपल्या अंगाला फासून ही त्रिमूर्ती का फिरत आहे? तृणमूलचे एक राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर यांनी बेइमानी केल्यावर सांगितले की, ‘‘ममता यांनी त्यांच्या काळात बंगालात घाणच घाण केली. 15 वर्षे ममतांनी ‘अस्ताव्यस्त’ कारभार केला म्हणून विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.’’ हे महाशय ममताकृपेने चार वेळा राज्यसभेचे खासदार झाले व प्रत्येक वेळेला ते ममतांची तोंड फाटेपर्यंत स्तुती आणि चमचेगिरी करत होते. ममतांचे राज्य हे गुंडांचे किंवा भ्रष्टाचाऱ्यांचे राज्य आहे असे यापैकी कोणीच तेव्हा सांगितले नाही. आता सोडून गेलेले तृणमूलचे सर्व आमदार, खासदार हे ममतांच्या नावावर निवडून आले. जे सोडून गेले त्यांनी सत्तेचा पुरेपूर भोग घेतला व सत्ता जाताच भाजपवासी झाले. आता मोदी-शहा-सुवेंदू अधिकारी त्यांना चारित्र्यवान परमेश्वर वाटू लागले. ममतांनी संघर्षातून उभा केलेला तृणमूल काँग्रेस पक्ष या बेइमान लोकांना आयताच दिला जाईल. मोदींच्या तपपूर्तीने बेइमानांना दिलेली ही प्रतिष्ठा आणि सन्मान आहे, जे याआधी कधीच झाले नव्हते. लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट असे सर्व एकजात या बेइमानांच्या पालखीचे भोई बनतात. मोदींच्या तपपूर्तीने देशातील बेइमानांना ‘बंडखोर’ बनवले. काय हे अचाट कार्य! देश या पडझडीतून पुन्हा एकदा उभा राहील. ममता बॅनर्जी यांनी बेइमानांच्या नाकदुऱ्या काढू नयेत. जायचे त्यांना जाऊ द्या. देशाला स्वाभिमान, देशाभिमानाची नवी पालवी फुटेल!