मोहम्मद सिराज टी-20 मालिकेतून बाहेर; बीसीसीआयचा अचानक निर्णय, प्रसिध कृष्णाचा संघात समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीसीसीआयने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला दोन्ही टी-20 सामन्यांच्या संघातून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने सिराजच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला संधी दिली आहे.

मोहम्मद सिराजला का वगळले?

बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, सिराजला कोणत्याही दुखापतीमुळे वगळण्यात आलेले नाही, तर आगामी व्यस्त आंतरराष्ट्रीय हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्याला विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने सांगितले की, ‘वैद्यकीय पथक आणि संघ व्यवस्थापन यांच्यात सविस्तर चर्चा झाल्यानंतर मोहम्मद सिराजला त्याच्या कामाच्या तणावाचे व्यवस्थापन (वर्कलोड मॅनेजमेंट) कार्यक्रमाचा भाग म्हणून विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आगामी व्यस्त हंगामापूर्वी तो पूर्णपणे फिट व्हावा यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.’

प्रसिध कृष्णाचे नशीब चमकले

सिराजच्या अनुपस्थितीमुळे वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला ही एक मोठी संधी मिळाली आहे. प्रसिध हा त्याच्या बाऊन्सर्स आणि वेगासाठी ओळखला जातो. आयर्लंड आणि इंग्लंडच्या वेगवान आणि अनुकूल खेळपट्टय़ांवर त्याची गोलंदाजी भारतीय आक्रमणाला आणखी मजबूत करू शकते. या दौऱयासाठी स्टार फलंदाज श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करत असून युवा तिलक वर्माची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वैभव सूर्यवंशी आणि प्रिन्स यादव यांसारख्या नवीन आणि युवा चेहऱयांचीही संघात निवड झाली आहे.