इन्स्टाग्रामवर ‘स्माईल’ इमोजी पाठवल्याने दोन गटांत राडा, चाकूहल्ल्यात तीन जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इन्स्टाग्राम स्टेटसवर स्माईल इमोजी पाठवल्याच्या वादातून यवतमाळमध्ये दोन गटात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने एका गटाने दुसऱ्या गटावर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून जखमींपैकी एकाच प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी बिटरगाव पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी पाच जण अल्पवयीन आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील एका स्टेटसवर ‘स्माईल’ इमोजी पाठवल्यामुळे दोन तरुणांमध्ये ऑनलाईन वाद निर्माण झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपी रात्री ढाणकी येथील सहारा पार्क परिसरात सुरू असलेल्या दुसऱ्या गटाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गेले.

कार्यक्रमात दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाला. पाहता पाहता हा वाद विकोपाला गेला आणि आरोपींनी चाकूने तिघांवर जीवघेणा हल्ला केला. यात एका तरुणाच्या मानेवर, दुसऱ्याच्या पाठीवर तर तिसऱ्याच्या बरगडीवर वार करण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते.

घटनेची माहिती मिळताच बिटरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे वाहन येताना दिसताच आरोपींनी पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी चपळाई दाखवत घटनास्थळावरूनच तिघा आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर विशेष शोधमोहीम राबवून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात आला आणि काही तासांत सर्व आरोपींना जेरबंद करण्यात आले.

या प्रकरणी 13 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारहाण, धमकी, बेकायदेशीर जमाव जमविणे आदी गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पांडुरंग शिंदे, पोउपनिरीक्षक सागर अन्नमवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.