हिंमत असेल तर भाजपच्या तिकिटावर जिंकून दाखवा! TMC च्या बंडखोरांना कल्याण बॅनर्जी व कीर्ती आझाद यांचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी व खासदार कीर्ती आझाद यांनी बंडखोरांच्या आरोपांना जोरदार उत्तर दिले. ‘आमच्या पक्षात गद्दारांची इतकी घुसमट होत होती तर त्यांनी निवडणुकीआधीच का सांगितले नाही? निकालानंतरच ते का बोलू लागले? त्यांच्यात थोडीशी नैतिकता आणि हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकून दाखवावी,’ असे आव्हान त्यांनी दिले.

‘तृणमूलवर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. खुद्द पंतप्रधान मोदी यांनी कॅमेऱ्यासमोर सुवेंदू अधिकारींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांच्यासोबत बैठका घेऊन तुम्ही कुठल्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी करता, असे आझाद यांनी सुनावले. गद्दारांना जायचे आहे तर जावे, पण त्यांनी तृणमूलचे नाव घेऊ नये, असा इशारा त्यांनी दिला. ही तृणमूलशी नाही तर निष्ठावान कार्यकर्त्यांशीही गद्दारी आहे, असे कल्याण बॅनर्जी म्हणाले.

तुमच्याकडं पैसे आहेत, सोने-चांदी आहे, बंगला आहे, नरेंद्र मोदी आहेत, अमित शहा आहेत. मुख्यमंत्री आहेत, ईडी आहे, सीबीआय आहे, संपूर्ण देशाची सत्ता आहे. पण आमच्याकडं माँ, माटी आणि मानुष आहे. आमचा पक्ष हीच आमची आई आहे. आमच्याकडं पक्ष आहे. कार्यकर्ते आहेत. पश्चिम बंगालची जनता आहे. खुशाल जा. – कल्याण बॅनर्जी