
‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ असा नावलौकिक कमावलेली बेस्टची बस सेवा सध्या ‘मृत्यूवाहिनी’ बनली आहे. बेस्टच्या ताफ्यात नाममात्र स्वमालकीच्या बस ठेवून खासगी गाड्यांना उपक्रम आंदण देण्याचा सरकारचा प्रयत्न नागरिकांच्या जिवावर उठला आहे. मुंबई शहर व उपनगरांत जीवघेण्या अपघातांचे सत्र सुरू राहिल्याने बेस्टच्या ताफ्यातील गाड्या ‘मृत्यूवाहिन्या’ बनल्या असून पुरेशा प्रशिक्षणाअभावी बेस्टचे स्टेअरिंग हाती घेणारे कंत्राटी चालक ‘यमदूत’ बनले आहेत. खासगीकरणाला कवटाळणारे महायुती सरकार हा जीवघेणा खेळ थांबवणार कधी, असा संतप्त सवाल मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे.
नेहमीच गजबजलेल्या दादर पश्चिमेकडील परिसरात सोमवारी बेस्टच्या ताफ्यातील ‘ओलेक्ट्रा’ कंपनीच्या बसने अनेक गाडय़ांना धडक दिली. त्यात गरीब कुटुंबातील स्विगी बॉयचा हकनाक बळी गेला. भीषण अपघातात अन्य सहा जण जखमी झाले. 2024 मध्ये कुर्ला, 2025 मध्ये भांडुप व 2026 मध्ये दादर अशाप्रकारे भीषण अपघातांची मालिका सुरू राहिल्याने बेस्टचा प्रवास अत्यंत असुरक्षित बनल्याचे उघड झाले आहे. दर काही दिवसांनी शहरात कुठे ना कुठे बसचा अपघात घडत असून त्याला एकतर बसमधील तांत्रिक बिघाड वा चालकाची चूक कारणीभूत ठरत आहे. यातून सरकार, बेस्ट प्रशासन आणि खासगी कंत्राटदार कंपन्या यांच्या ‘युती’चे अपयश चव्हाटय़ावर येत आहे. कंत्राटदार कंपन्यांशी बेस्टमधील वरिष्ठ अधिकाऱयांचे ‘साटेलोटे’ अनेक नियमांना धाब्यावर बसवत आहे. वाढत्या अपघातांमागील हेदेखील एक मुख्य कारण असल्याचा आरोप केला जात आहे. मागील तीन वर्षांत बेस्ट बस गाड्यांचे 958 अपघात घडले. त्यापैकी 85 टक्क्यांहून अधिक अपघात हे बेस्टच्या ताफ्यातील पंत्राटी बसला झाले. जानेवारी 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत नोंद झालेल्या अपघातांमध्ये 77 जणांचा बळी गेला, तर 217 जण जखमी झाले. तब्बल 815 अपघात कंत्राटी म्हणजेच भाडेतत्त्वावरील बसला झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या गाडय़ांचा मुद्दा चर्चेत आला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या अवघ्या 249 बस शिल्लक राहिल्या आहेत.
कंत्राटी चालकांना पुरेसे प्रशिक्षणच नाही!
दिंडोशी आगारात मूळ बेस्टच्या चालकांना ड्रायव्हिंगचे तीन महिन्यांचे सक्तीचे प्रशिक्षण दिले जायचे. ही सक्ती कंत्राटी चालकांसाठी नसून त्यांना केवळ सहा आठवडय़ांचे म्हणजेच दीड महिन्याचे प्रशिक्षण दिले जाते. या अपुऱ्या कालावधीच्या प्रशिक्षणाच्या जोरावरच त्यांना बेस्ट बस चालवण्यासाठी रस्त्यावर उतरवले जात आहे. ते चालक मुंबईकरांसाठी ‘यमदूत’ बनल्याचे स्पष्ट होत आहे.
इलेक्ट्रिक बसमध्ये अनेक दोष, त्यात देखभालीची बोंब
शहराच्या रस्त्यावर धावणाऱया इलेक्ट्रिक बसमध्ये दोष आहेत. त्याअनुषंगाने दर आठवडय़ाला कंत्राटदारांच्या 25 टक्के गाडय़ांची तपासणी बेस्टच्या कर्मचारी-अधिकाऱयांमार्फत केली जाते. बेस्टचे कर्मचारी त्या-त्या गाडीतील दोष निदर्शनास आणून देत अहवाल कंत्राटदार पनीकडे देतात. त्या अहवालाला अनुसरून गाडीतील दोष दूर करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची असते. मात्र अहवालातील सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करून दोष दुरुस्त केले जातात की नाही, यावर देखरेख ठेवणारी व्यवस्था नसल्याने खासगी कंपन्यांचे फावल्याची चर्चा बेस्ट उपक्रमातील कर्मचारी वर्गात सुरू आहे.
दुचाकीवर एवढा राग का?
बेस्ट बस रस्त्यावर दुचाकी आणि छोटय़ा वाहनांना दाबत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यातून अपघात होऊन अनेक मृत्यू झाले आहेत. दादरच्या अपघातानंतर दुचाकीवर एवढा राग का, असा संतप्त सवाल केला जात आहे.























































