
‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या 42 व्या स्मृतिदिनानिमित्त पंजाबच्या अमृतसरमध्ये आयोजित कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. महाजन यांनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा दिवस हा काळा दिवस होता असे म्हणत तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही टीका केली. तसेच भिंद्रनवाले आणि त्याच्या सहकाऱयांना शहीद असे संबोधले. त्यावरून त्यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे.
पवित्र सुवर्ण मंदिर परिसरात सैन्य कारवाई करण्याचा निर्णय हा शीख समाजासाठी वेदनादायी होता. या कारवाईदरम्यान अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आणि समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या, असे महाजन आपल्या भाषणात म्हणाले. ऑपरेशन ब्लू स्टारची तुलना त्यांनी 18व्या शतकातील अहमदशाह अब्दालीच्या आक्रमणाशी केली. तसेच 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात झालेल्या शीखविरोधी दंगलींचा उल्लेख करत काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले. महाजन यांच्या या वक्तव्यांनंतर महाराष्ट्रासह देशभरात त्यांचा निषेध होत आहे.
…तर आज अखंड हिंदुस्थान दिसला नसता – विजय वडेट्टीवार
इंदिरा गांधी यांनी तो निर्णय घेतला नसता तर देशाचे तुकडे झाले असते. आज अखंड हिंदुस्थान दिसला नसता. महाजन यांच्यासारखे लोक अभ्यास न करता बोलतात, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
महाजनांना मंत्रिमंडळातून हाकला – संजय राऊत
इंदिरा गांधी यांची लढाई ही राष्ट्रासाठी होती. जनरल अरुणकुमार वैद्य, पंजाबचे मुख्यमंत्री बियांतसिंग यांच्यासह हजारो लोकांनी बलिदान दिले. पंजाबमधील दहशतवाद मोडून काढण्यासाठी जे. एफ. रिबेरो यांनी मोठे योगदान दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे राष्ट्रभक्त असतील तर ऑपरेशन ब्लू स्टारला काळा दिवस म्हणणाऱया महाजनांना पदावरून हाकलले पाहिजे, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले.
हा सैन्यदलाचा अपमान – हर्षवर्धन सपकाळ
महाजन यांचे वक्तव्य बेजबाबदार आणि देशाच्या सैन्याचा अवमान करणारे आहे. देशाच्या अखंडतेसाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांनी दहशतवादाविरोधातील हिंदुस्थानच्या लढय़ालाच कमी लेखले आहे. महाजन यांची मंत्रिमंडळातून व भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.































































