
मरीन ड्राईव्ह येथील मराठी भाषा भवनाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे, पण आता मराठी भाषा भवन डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती आज राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवनाचा पायाभरणी समारंभ झाला होता. आता महायुती सरकार आल्यानंतर मराठी भाषा भवन उभारण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे.
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज मराठी भाषा भवनांच्या बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मराठी भाषा भवनाच्या कामाला काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला होता. मात्र आता भाषा भवनाचे काम वेगाने सुरू आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्यातील सात ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्रे सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. ही सात केंद्रे रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती येथे उभारली जाणार आहेत
जागतिक स्तरावर मराठीचा प्रसार करण्यासाठी लंडन येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज जागतिक मराठी भाषा केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. पुढील काही महिन्यांत हे केंद्र कार्यान्वित होणार असून मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी माहिती त्यांनी दिली
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा अधिकारी नियुक्त करण्यात येणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषेचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.





























































