मे आणि जून महिन्यातील अवकाळीने तब्बल 56 हजार हेक्टरवरील शेतीला फटका, 24 जिह्यांमधील फळबागा-भाजीपाला उद्ध्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात मे आणि आता जून महिन्यात गारपिटीसह झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे राज्यातील शेतीला जोरदार फटका बसला असून, 56 हजार 533 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य सरकारकडील आकडेवारीनुसार नैसर्गिक आपत्तीमुळे 24 जिल्ह्यांतील फळबागा, भाजीपाला आणि विविध हंगामी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

राज्य शासनाच्या अहवालानुसार राज्यात 1 जून ते 8 जून या कालावधीत राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱयांसह अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. या पावसाने एकूण 56 हजार 533 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, तर मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे 40 हजार 215 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, तर जूनमध्ये झालेल्या वादळी वाऱयाने 17 हजार 932 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

जळगाव, बुलढाणा, सोलापूर आणि अकोला या जिह्यांना अवकाळी पावसाचा जास्त फटका बसला आहे. या भागात वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यात केळी, मका, कांदा, टरबूज, कलिंगड, भाजीपाला, डाळिंब, संत्रा, द्राक्ष आणि आंबा या पिकांचा समावेश आहे. केळी, द्राक्ष आणि डाळिंब यांसारख्या नगदी पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर आंबा आणि संत्रा उत्पादकांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.