
पालिका प्रशासनाकडून 100 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात मुंबईतील अनेक नाले अजूनही गाळ आणि कचऱ्याच्या ढिगांनी भरलेले आहेत. याबाबत आज पालिकेतील विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी वाकोला नदीची पाहणी करून पालिकेच्या दाव्यांची पोलखोल केली. अत्यंत बेजबाबदार प्रशासन आणि वचक नसलेल्या भाजप-शिंदे गट सत्ताधाऱ्यांमुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला. यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यास सत्ताधारी-प्रशासनच जबाबदार राहतील, असा इशाराही पेडणेकर यांनी दिला.
पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज वाकोला नदीची प्रत्यक्ष पाहणी केली असता नदीची स्वच्छता व गाळ काढण्याच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नसल्याचा प्रकार समोर आला. यावेळी नगरसेविका श्रद्धा जाधव, नगरसेवक रितेश राऊत, नगरसेवक अंकित प्रभू यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, वाकोला नदीमध्ये सुमारे एक फूट घनकचरा व तरंगता कचरा साचलेला आहे. नियमानुसार प्रथम हा घनकचरा हटवून त्यानंतर गाळ उपशाचे काम करण्यात येते. मात्र 9 जून उजाडला तरी या प्राथमिक कामांनाही सुरुवात झालेली नाही, ही अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बाब आहे.
अजून निविदा प्रक्रियाही पूर्ण नाही
चिंतेची बाब म्हणजे वाकोला नदीतील गाळ काढण्याच्या कामासाठी अद्याप निविदा प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. एकीकडे सत्ताधारी भाजप नालेसफाई आणि पूरनियंत्रणाच्या कामांबाबत मोठमोठे दावे करत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्षात नदी-नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. आकडेवारीच्या फुगवलेल्या दाव्यांमागे वास्तव लपवण्याचा प्रयत्न होत असला तरी वाकोला नदीतील परिस्थिती सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेचे आणि प्रशासनावरील ढासळलेल्या नियंत्रणाचे उदाहरण आहे, असेही पेडणेकर म्हणाल्या.































































