दहावीच्या ६० विद्यार्थ्यांना अखेर गुणपत्रिका, लिव्हिंग सर्टिफिकेट मिळाले; दैनिक ‘सामना’च्या दणक्यानंतर केडीएमसी प्रशासनाला जाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेतिवली येथील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ११ मधील उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या ६० विद्यार्थ्यांना अखेर गुणपत्रिका व लिव्हिंग सर्टिफिकेट मिळाली आहेत.

दैनिक ‘सामना’च्या दणक्यानंतर केडीएमसी प्रशासनाला जाग आली असून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्याकडे गुणपत्रिका व लिव्हिंग सर्टिफिकेट सुपूर्द केली. त्यामुळे मुलांच्या अकरावी प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

नेतिवली भागात महानगरपालिकेची शाळा आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना गुणपत्रिका आणि लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्याची दैनिक ‘सामना’ने दखल घेत याबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती.

विद्यार्थ्यांवरील अन्यायाला वाचा फोडल्यानंतर केडीएमसीचा शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आणि सर्व ६० विद्यार्थ्यांना बोलावून त्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे दिली.

विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व लिव्हिंग सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे अकरावीचे प्रवेश रखडले होते. यासंदर्भात हवालदिल झालेल्या पालकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी कल्याण शहरप्रमुख सचिन बसरे व सुरेश तेलवणे यांची भेट घेतली. त्यांची व्यथा जाणून घेतल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी, पालक व विद्यार्थी यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसीचे उपायुक्त प्रसाद बोकर यांची भेट घेऊन तीव्र संताप व्यक्त केला. “विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळाल तर याद राखा,” असा इशाराही शिवसेनेने दिला.

पालकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

नेतिवली भागातील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवरील अन्यायाला दैनिक ‘सामना’ने वाचा फोडताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून गुणपत्रिका आणि लिव्हिंग सर्टिफिकेटचे वाटप केले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला असून त्यांनी शिवसेना व दैनिक ‘सामना’चे आभार मानले आहेत.