नरेंद्र मोदींनी 12 वर्षात देश चुकीच्या दिशेला नेला – हर्षवर्धन सपकाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम करून पंडित जवाहलाल नेहरुंच्या पंतप्रधानपदापेक्षा जास्त काळ ते पदावर आहेत, असा ढोल पिटला जात आहे. परंतु नरेंद्र मोदी यांचे १२ वर्षातील कर्तृत्व व देशासाठी योगदान काय हे शोधावे लागेल. गेल्या १२ वर्षात नरेंद्र मोदी देशाला चुकीच्या दिशेने घेऊन गेले, त्याची मोठी किंमत पुढील अनेक वर्ष देशाला मोजावी लागणार आहे. १२ वर्षांच्या मोदी सरकारच्या कामाचे मुल्यमापन करायचे झाले तर मोदी सरकारमध्ये ‘राम’ही नाही व दाखवावे असे एकही ‘काम’ नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना ते असे म्हणाले आहेत.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला हमीभाव देणार, १०० स्मार्ट सिटी निर्माण करणार, दहशतवादाचा बिमोड करणार, पेट्रोल डिझेल ३५ रुपये लिटर तर गॅस सिलेंडर १०० रुपयाला देणार आणि ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’, अशा राणा भिमदेवी थाटात घोषणा केल्या पण यातील एकही काम झालेले नाही. रुपया घसरत १०० च्या जवळ पोहचला, जीडीपी घसरला, ‘मेक इन इंडिया’ फेल गेला, ‘स्टार्टअप’ फेल गेला आणि अमेरिकेसमोर मोदी सरंडर झाले हे त्यांचे कर्तृत्व आहे. मोदींच्या काळात भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढला असून ‘हम दो, हमारे दो, अशी या सरकारची ओळख झाली असून मुठभर उद्योगपतींसाठी हे सरकार काम करत आहे, असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला.

पंडित जवाहरलाल नेहरुंनी स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानाला जगात एक महत्वाचे राष्ट्र अशी ओळख निर्माण करुन दिली. मोठी धरणे बांधली, इस्त्रो, भाभा अणुशक्ती केंद्र, IIT, IIM, सारख्या संस्था उभ्या केल्या. विविध क्षेत्रात मोठ्या संस्था उभ्या केल्या, पायाभूत सुविधा निर्माण केल्या. नेहरुंचे नेतृत्व जगाने मान्य केले. पंडित नेहरु स्वातंत्र्य चळवळीत ११ वर्षे जेलमध्ये होते. पंडित नेहरु, लालबहाद्दुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही नरसिंहराव, डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वात देशाने विकास व प्रगतीचा मोठा टप्पा गाठला. राजीव गांधी यांनी संगणक क्रांती आणली, २१ शतकात देशाला घेऊन गेले, सत्तेचे विकेंद्रीकरण केले. तर शिक्षण हक्क कायदा, माहिती अधिकार कायदा, अन्नसुरक्षा कायदा, मनरेगा, अशा योजना काँग्रेस सरकारने आणल्या. काँग्रेसच्या सरकारने नवी आर्थिक क्रांती आणली, कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली पण मोदींनी काय केले, हा मोठा संशोधनाचा विषय आहे, असेही सपकाळ म्हणाले.