
पाकिस्तान व्याप्त कश्मीरमधील मुझफ्फराबाद शहराजवळ तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानी लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळले असून यामध्ये हॅलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाल्याचे लष्कराने सांगितले. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याचे वृत्त आहे.
लष्कराच्या मीडिया विंगने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘पाकिस्तान आर्मी एव्हिएशनचे एक एमआय-१७ (Mi-17) हेलिकॉप्टर आज मुझफ्फराबादजवळ उड्डाण करत असताना तांत्रिक बिघाडामुळे कोसळले.’
यात किती लोक मारले गेले याचा नेमका आकडा स्पष्ट न करता, ‘हेलिकॉप्टरमधील सर्व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे,’ असे लष्कराने पुढे सांगितले.
सरकारने दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत एका आंदोलन करणाऱ्या संघटनेवर बंदी घातल्यानंतर, या संघटनेच्या सदस्यांनी लवकरच निदर्शने करण्याची घोषणा केली होती; ज्यामुळे गेल्या काही दिवसांत मुझफ्फराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.




























































