
सध्याच्या धावपळीच्या युगात ‘मानसिक आरोग्य’ (Mental Health) ही सर्वात मोठी आरोग्यविषयक समस्या म्हणून समोर येत आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) 2024च्या ताज्या आकडेवारीतून या संकटाची भीषणता स्पष्ट झाली आहे. या अहवालानुसार, हिंदुस्थानात 2024 मध्ये 1,70,746 आत्महत्यांची नोंद झाली. यापैकी एकट्या महाराष्ट्रात 22,174 जणांनी टोकाचे पाऊल उचलून आपला जीव गमावला. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 19,965 आणि मध्य प्रदेशात 15,491 आत्महत्यांची नोंद झाली. ही आकडेवारी केवळ एक सामाजिक समस्या नसून देशात वेगाने पसरत चाललेल्या मानसिक तणावाचा आणि नैराश्याचा एक गंभीर इशारा आहे.
विद्यार्थी आणि तरुण वर्गात वाढता तणाव
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, तरुण आणि विद्यार्थ्यांमधील वाढता मानसिक ताण हे या आत्महत्येमागील सर्वात मोठे कारण आहे. स्पर्धा परीक्षांचे ओझे, करिअरची अनिश्चितता आणि कुटुंबासह समाजाच्या वाढत्या अपेक्षांमुळे तरुणांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत मध्य प्रदेश देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात होणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांच्या आत्महत्येपैकी तब्बल 10 टक्के आत्महत्या एकट्या मध्य प्रदेशात होत आहेत.
यातही विद्यार्थिनींवरील मानसिक दबाव अधिक असल्याचे दिसून आले आहे. 2024 मध्ये मध्य प्रदेशात 716 विद्यार्थी तर 731 विद्यार्थिनींनी टोकाचे पाऊल उचलले. वाढता शैक्षणिक दबाव आणि भावनिक संघर्ष याला कारणीभूत आहे. आत्महत्या हा कधीही अचानक घेतलेला निर्णय नसतो. त्यामागे दीर्घकाळ चाललेला मानसिक संघर्ष, नैराश्य आणि चिंता लपलेली असते. त्यामुळे या आजाराची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पुढील लक्षणे दिसल्यास सावध व्हा –
– वारंवार मृत्यू किंवा आत्महत्येविषयी बोलणे.
– तीव्र चिंता, अस्वस्थता आणि स्वतःला निरुपयोगी समजणे.
– अचानक मित्र, कुटुंब आणि लोकांपासून स्वतःला दूर करणे.
– आपल्या आवडत्या वस्तू इतरांना देऊन टाकणे.
तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी मिळालेले वैद्यकीय उपचार आणि कुटुंबाचा भावनिक आधार यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात. तसेच पुरेशी झोप, नियमित व्यायाम, सोशल मीडियाचा मर्यादित वापर आणि भावना मोकळ्या करणे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते.
मानसिक आरोग्याविषयीची सेवा केवळ मोठ्या शहरांपूरती मर्यादित न राहता ती गावोगावी आणि छोट्या शहरांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज बनली आहे. शाळा-कॉलेजांमध्ये समुपदेशन केंद्र (Counseling Centers) सुरू करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध करून देणे आणि मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवणे, या उपायांनीच आपण या गंभीर संकटाचा सामना करू शकतो, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.




























































