रायगडात 11 दारूमाफियांना अटक; पुणे मृत्यू प्रकरणानंतर पोलिसांची मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील हडपसर आणि पिंपरी -चिंचवडमधील १८ जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला होता. या पाश्र्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू धंद्यांविरोद्धात धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या १० दिवसांत १६५ दारूमाफियांवर गुन्हे दाखल करून १११ जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे दारूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

पुणे येथील दारू कांडानंतर रायगड जिल्ह्यातील अवैध दारू धंद्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा धडाका लावला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूचे धंदे सुरू आहेत. जंगल तसेच खाड्यांमध्ये राजरोसपणे गावठी मद्याच्या भट्टया पेटवण्यात येत आहेत. या अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम हाती घेतली आहे. दारूच्या भट्ट्यांवर धाड टाकण्याबरोबरच अवैध दारूची वाहतूक, विक्री रोखण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.

३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

२९ मे ते ७ जूनदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात धडक कारवाई करत ३८ लाख ४६ हजार १५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये विदेशी दारू, गावठी दारू, दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या रसायनांसह वाहतुकीसाठी वापरलेल्या एका वाहनाचाही समावेश आहे. याप्रकरणी १६५ गुन्हे दाखल करत १११ जणांना अटक केली आहे. मात्र अवैध दारूच्या धंद्यातून प्रचंड कमाई होत असल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून वेळोवेळी कारवाई होऊनही हे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे दिसून येत आहे.