मुंबई महापौर कार्यालयाला धमकीचा ई-मेल; तीन ते चार शाळांमध्येही बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलीस अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांच्या कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या ई-मेलमध्ये मुंबईतील तीन ते चार शाळांमध्येही बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. महापौरांच्या कार्यालयाला धमकी मिळण्याची ही तिसरी घटना असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

दरम्यान, धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या. पोलिसांनी बॉम्ब शोधक पथका आणि श्वानपथकाच्या मदतीने संबंधित ठिकाणी तपासणी केली, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ‘आयएएनएस’ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील भाईंदर रेल्वे स्थानक आणि भाईंदर पोलीस ठाणे उडवण्याची धमकी देणारा ई-मेल मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस मुख्यालयाला प्राप्त झाला होता. बुधवारी हा ई-मेल मिळाल्यानंतर पोलिसांची पथके तातडीने दोन्ही ठिकाणी दाखल झाली. पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने परिसराची कसून तपासणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसराची झडती घेण्यात आली; मात्र कोणतीही स्फोटक सामग्री किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे ही धमकी अफवा असल्याचे स्पष्ट झाले.