हुंड्यात थार आणि बाईक न दिल्याने पतीने पत्नीला रस्त्यावर बेदम मारहाण केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नानंतर हुंड्यात महिंद्रा थार (Mahindra Thar) आणि दुचाकी न दिल्याने पतीने आपल्या पत्नीला रस्त्यावर केस धरून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना पंजाबमधील लुधियाना येथे घडली आहे. २१ ऑक्टोबरच्या रात्री घडलेला हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेल्थकेअर क्षेत्रात काम करणाऱ्या रितीश शर्माचे लग्न सलून चालवणाऱ्या ट्विंकलसोबत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झाले होते. ट्विंकलचे हे दुसरे तर रितीशचे पहिले लग्न होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी ट्विंकलच्या पहिल्या घटस्फोटाच्या कायदेशीर प्रक्रियेदरम्यान दोघांची ओळख झाली होती, ज्याचे रूपांतर पुढे प्रेमात होऊन त्यांनी लग्न केले.

थार गाडी आणि बाईकसाठी दररोज वाद

ट्विंकलने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच पतीने तिच्याकडे महिंद्रा थार गाडीची मागणी सुरू केली. यावरून घरात रोज भांडणे होत होती. नातेवाईक व मध्यस्थांच्या मदतीने हा वाद मिटवण्याचा प्रयत्नही झाला; मात्र त्यानंतर रितीशने नवीन बाईकचा हट्ट धरला.

रस्त्यावर ओढून मारहाण

घटनेच्या दिवशी बाईकच्या मागणीवरून वाद विकोपाला गेला. पतीच्या मारहाणीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ट्विंकल पळत शेजाऱ्यांच्या घराकडे गेली. मात्र, रितीशने तिचा पाठलाग केला आणि तिला घराबाहेर रस्त्यावर ओढत आणले. त्याने तिचे केस पकडून तिला कानशिलात लगावत बेदम मारहाण केली.

तिचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे शेजारी घराबाहेर धावून आले आणि त्यांनी तिची सुटका केली. या मारहाणीनंतर ट्विंकलने पोलिसांत औपचारिक तक्रार दाखल केली असून पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या तक्रारीच्या आधारे पोलीस आता आरोपी पती रितीश शर्माविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.