IND vs AFG ODI Series – टीम इंडियाला मोठा धक्का; फिटनेस टेस्ट पास करूनही हार्दिक पंड्या वन डे मालिकेला मुकणार, नेमकं कारण काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान संघात 13 जूनपासून तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. याआधी रनमशीन विराट कोहली हा देखील स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला होता.

बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आठवडाभर विविध चाचण्या आणि फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर हार्दिक पंड्याला सुरुवातीला फिटनेस क्लिअरन्स मिळाला होता. मात्र, मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे तो आता अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून बाहेर गेला आहे. फिट होण्यासाटी आता त्याला सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आणखी काही काळ थांबावे लागणार आहे, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

बदली खेळाडूबाबत सस्पेन्स

दरम्यान, 32 वर्षीय हार्दिक पंड्याच्या जागी संघ व्यवस्थापन आणि निवड समिती अन्य कोणत्या खेळाडूचा संघात समावेश करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, जुलै महिन्यात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या एकदिवसीय मालिकेतील त्याच्या सहभागावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विराट कोहली, सिराजही बाहेर

अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या वन डे मालिकेपूर्वी टीम इंडियामागे दुखापतीचे ग्रहण लागले आहे. विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि आता हार्दिक पंड्याही संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. सिराजच्या जागी प्रसिध कृष्णा याची संघात निवड करण्यात आली आहे. तर कोहलीच्या जागी यशस्वी जैस्वाल मैदानात उतरेल. दुसरीकडे रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली असून तो देखील ही मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे.

मोहम्मद सिराज टी-20 मालिकेतून बाहेर; बीसीसीआयचा अचानक निर्णय, प्रसिध कृष्णाचा संघात समावेश