
मुंबईच्या पालघर (बोईसर) येथील असलेला आयुष शुक्ला याने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग चार ओव्हर्स मेडन टाकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा आयुष हा आशियातील पहिला, तर जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. मंगोलियाविरुद्धच्या पात्रता सामन्यात हाँगकाँककडून खेळताना आयुषने ही ऐतिहासिक कामगिरी करत साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने आपल्या 4 षटकांमध्ये 18 चेंडू सलग निर्धाव टाकले आहेत.
क्रिकेट जगतात यापूर्वी केवळ कॅनडाच्या साद बिन जफरने (2021 मध्ये पनामाविरुद्ध) आणि न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनने (2024 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पापुआ न्यू गिनीविरुद्ध 4-4-0-3 असा स्पेल टाकत) हा पराक्रम केला होता. आता या दिग्गज गोलंदाजांच्या पंगतीत आयुषने आपले नाव कोरले आहे. हाँगकाँगच्या संघाचा नियमित सदस्य असलेल्या आयुषने आतापर्यंत खेळलेल्या 34 सामन्यांत 29 विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी 2023 मध्ये कंबोडियाविरुद्ध खेळतानाही त्याने 4 ओव्हर्समध्ये अवघ्या 3 धावा देत 1 विकेट घेण्याची उत्कृष्ट कामगिरी केली होती. आयुष शुक्लाच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे त्याने आशिया चषकात हिंदुस्थानी संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला बाद केले होते, ज्याला तो आपल्या जीवनातील सर्वात मोठे यश मानतो. त्याने आपल्या अचूक आणि धारदार गोलंदाजीने जागतिक क्रिकेटचे लक्ष वेधून घेतले आहे.






























































