साखरपुड्याच्या आनंदावर विरजण; अमळनेरजवळ तिहेरी अपघातात 6 ठार, मृतांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमळनेर धुळे महामार्गावर मंगळवारी सकाळी सात वाजता भीषण तिहेरी अपघात झाला. बस आणि दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीचा चुराडा झाला, तर कारमधील पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. दुचाकीस्वारही या अपघातात ठार झाला. कारमधील प्रवासी हे गुजरातेतील व्यारा येथून साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येत होते.

गुजरातेतील व्यारा येथून महाजन कुटुंब साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी धुळ्याकडून कारने अमळनेरला येत होते. याचवेळी एक दुचाकी आणि परिवहन महामंडळाची बस अमळनेरहून धुळ्याकडे जात होती. मंगरूळ गावाजवळ हॉटेल वृंदावनसमोर अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार एकाचवेळी बस आणि दुचाकीला धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की चुराडा झालेली दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकली गेली. यात दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. या धडकेत कारच्या समोरचा भागही संपूर्ण चेपला गेला. कारमधील प्रवाशांना बचावाची संधीच मिळाली नाही.

कारमधील आदित्य चंद्रकांत महाजन, अनिता सुरेश महाजन, निर्मला नंदलाल महाजन, नंदलाल गोपाल महाजन, सुरेश विक्रम महाजन हे पाचही जण ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवि पाटील तसेच पोलीसपाटील भागवत पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात एसटी बसमधील दीपक दिलीप पाटील हे प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच इतर काही जणांनाही किरकोळ दुखापत झाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले होते. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली.

लहान मुलगा वाचला

कारचा समोरचा भाग चेपल्यामुळे कुणालाच बाहेर पडता आले नाही. एक लहान मुलगाही कारमध्ये अडकला होता. पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ आणि एसटी कर्मचाऱ्यांनी कारचा चेपलेला भाग महत्प्रयासाने बाजूला करून या चिमुकल्याला बाहेर काढले.